सोलापूर : विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारास सोलापूर पोलीस आयुक्तालयाने एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले. प्रेम रामचंद्र राठोड (वय-२५ वर्षे) असे त्याचे नांव असल्याची माहिती आयुक्तालय माहिती कक्षातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये देण्यात आली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर तांडा येथील रहिवासी असलेला प्रेम रामचंद्र राठोड याने अवैधरित्या आर्थिक फायदा मिळवण्यासाठी घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी चैन स्नैचिंग, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दुखापत करणे, खंडणी मागणे आणि धमकी देणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने करीत आला आहे.
त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. प्रेम रामचंद्र राठोड याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्यांनी सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याचेविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असंही यापूर्वी पोलीस आयुक्तालयाचे निदर्शनास आले.
प्रेम राठोड यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१२, सन २०१३ मध्ये वेगवेगळे कलम आणि अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या. त्यानंतरही प्रेम राठोड याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी २५ सप्टेंबर रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करून, त्यास रविवारी, ०१ ऑक्टोबर रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.
पोलीस आयुक्त, डॉ. राजेंद्र माने यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची पंधरावी व या वर्षातील अकरावी कारवाई आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने,
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्राजंली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग ०२) राजु मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दोरगे, विजापुर नाका पोलीस ठाणे, राजकुमार वाघचवरे, पोउपनि विशेद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अमलदार पोहेकॉ विनायक संगमवार, पोहेकॉ सुदीप शिंदे, पोशि अक्षय जाधव, पोशि विशाल नवले यांनी केली आहे.