सोलापूर :
जश्न ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने लोकशाही फाऊंडेशन आणि आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शास्त्री नगरातील महादेव चौक येथे शनिवारी, २९ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात जवळपास सव्वाशेहुन अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदूची बाधा असणारे ४० रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी कार्ड बनवून देण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने सोलापुरातील अनेक सेवाभावी व सामाजिक संस्थांनी आपापल्या परीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते. विविध सेवाभावी संस्थांनी जुलूस मार्गावर सरबत वाटप, फळांचे वाटप केले होते. काही संस्थांनी अन्नदानाचे उपक्रम राबविले. ह्या जल्लोषी वातावरणापासून दूर राहून लोकशाही फाउंडेशन आणि आजाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्याचे निरसन करण्याच्या उद्देशाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीनगर महादेव चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात १२० हून अधिक रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यात जवळपास ४० नेत्र रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी कार्ड बनवून देण्यात आले. लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीम राजा बागवान यांच्यावतीने ६० ते ७० रुग्णांना चष्म्याची फ्रेम मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
या आरोग्य शिबीरात मतदार नोंदणी व हिजामा शिबीरही ठेवण्यात आले होते. शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी
दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.