सोलापूर : अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी जारी केलेल्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू इत्यादी तत्सम अन्न पदार्थाचा विक्री हेतू महाराष्ट्र राज्यामधून उत्पादन वाहतुक, साठा विक्री बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय. उभयतांच्या ताब्यातून २७ लाख रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आलीय. ते एका मालट्रकमध्ये हा अवैध साठा घेऊन निघाले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती, सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात रविवारी सकाळी ११.१५ वा. च्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका रमेश पाटील यांनी अशोक लिलँड ट्रक (के ए ५६ /०४८५) ची तपासणी करता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूच्या प्रत्येकी २५ किलो वजनाच्या विना लेबलच्या १२० बॅग आढळल्या, या सुगंधित तंबाखूची किंमत प्रत्येक किलो ९०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी गौस पाशा महमद खुर्शीद (वय ४५ वर्षे, रा. घर नं. ७-८००, नया मोहल्ला, मिजगोरी रोड, हज कमिटीजवळ, गुलबर्गा, राज्य- कर्नाटक) आणि खाजामियाँ मोहमद मशाक शेख (वय - ४९ वर्षे, रा. न्यू गौतम नगर, प्लॉट नं. ४, शिवशक्ती सेवासंघ गोवंडी, मुंबई) यांच्याविरुद्ध भादवि ३२८, २७३, २७३, १८८, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम २००६ चे २६(२)(i), २६(२)(ii), २६ (२) (iv), सहवाचन कलम २७ (३) (E), ३० (२) (A) ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे सपोनि पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.