सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाने शनिवारी शिडशिंगे (ता. माढा) या गावात गोवा राज्यातील विदेशी दारूसह एक कार व एक मोटरसायकल असा 3 लाख 83 हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध हातभट्टी दारू, परराज्यातील दारू तसेच बनावट दारू इत्यादी विरुद्ध सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून शनिवारी दुपारच्या सुमारास दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क करमाळा यांनी त्यांचे पथकासह शिडशिंगे (ता. माढा) या ठिकाणी सापळा रचून पाळत ठेवली असता कैलास दशरथ वाघमोडे (वय-36 वर्षे) हा इसम त्याच्या दुचाकी क्रमांक MH 13 DA 4778 हिरो स्प्लेंडर वरून पोते घेऊन येत असल्याचे दिसून आल्याने त्याला थांबवून तपासणी केली असता पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेले एड्रियल व्हिस्की 750 मिली क्षमतेच्या बाटल्या दिसून आल्या.
याबाबत पुढील तपासात आरोपीच्या राहत्या घरी जाऊन तपासणी केली असता घरासमोर उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कंपनीची कार क्रमांक MH12 EM 3833 या चार चाकी वाहनाची झडती घेतली असता त्यातून गोवा राज्यात विक्रीस असलेल्या एड्रियल व्हिस्की विदेशी मद्याच्या बाटल्या व काही रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेल्या एड्रियल व्हिस्की विदेशी दारूच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 72 बाटल्या व 180 मिली क्षमतेच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या तसेच एक दुचाकी व एक चारचाकी वाहन असा एकूण तीन लाख त्र्यांशी हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक करमाळा विनायक जगताप हे करत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक विनायक जगताप, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे , जवान विकास वडमिले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे परिसरातील अवैध दारू बाबत या विभागास माहिती द्यावी.