... मदतीसाठी आपण सदैव तयार : आ. सुभाष देशमुख सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने कार्यशाळा संपन्न

shivrajya patra
सोलापूर केंद्र सरकारने अनेक नागरी हितांच्या योजना आणल्या आहेत. त्या सर्व योजना प्रत्येक गावात राबवण्यात येणार आहेत. आता सर्वांनी शेतीला पूरक असा व्यवसाय करावा, त्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागली असेल आपण ती  करण्यास कटिबद्ध आहोत. प्रत्येक गाव हरित करणे, हा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर सोशल फाउंडेशन आणि जिव्हाळा शेती कर्मचारी च्या वतीने अंत्रोळी येथे रविवारी आयोजित समृद्धी कार्यशाळेत आमदार सुभाष देशमुख बोलत होते. या कार्यशाळेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संचालक डॉक्टर रमेश जारे, समृद्ध गाव अभियान जिल्हा समिती प्रमुख मोहनराव अनपट, कृषीतज्ञ मनोज शहा आदींची उपस्थिती होती.
आ. देशमुख पुढे म्हणाले,  केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात यंदाच्या भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांच्या लागवड, साठवण, वितरण आणि विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत़, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. प्रत्येक गावात शाळा आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यावर आपला भर राहणार आहे. सर्वांनी आता शेतीव्यतिरिक्त त्याला पूरक असा व्यवसाय सुरू करावा, त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही आमदार देशमुख यांनी दिले.


लोकसहभागातून ग्राम विकास कसा करावा, हे  माझ्या  चिंचणी गावातील लोकांकडून शिकावे. आमचे गाव समृद्ध आहे, पर्यटन आहे. गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध आहॆ. हे सर्व आ. देशमुख यांच्या प्रयत्नामुळे झाले आहे, असे मोहन अनपट यांनी सांगितले.

कृषितज्ञ मनोज शहा म्हणाले, आपण गावांसाठी आगोदर काहीतरी देणे लागतो, याचा विचार सर्वांनी करावा. सेंद्रिय शेती आपण उदयास आणली पाहिजे. प्रकिया उद्योग प्रत्येक गावात उभा केला पाहिजे. शेतीशिवाय ग्राम विकास शक्यच नाही. 

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये रमेश जारे यांनी ग्रामपंचायती योजनेच्या पाढा वाचत त्यातून गावाचा विकास करून घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिव्हाळा शाळेचे विश्वस्त डॉ. विलास बालगावकर यांनी केले तर अतुल गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

यावेळी उपस्थित सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेला अंत्रोळी सरपंच सौ.माया सलगरे, प्रगतशील बागायतदार नानासाहेब झांबरे, माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, डॉ. चनगोंडा हविनाळे, मळसिद्ध मुगळे, सोलापूर सोशल फाउंडेशन चे मुख्य समन्वयक विजय पाटील, दक्षिण तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व स्वयंसेवी सदस्य उपस्थित होते.
To Top