सोलापूर : चैन स्नॅचिंग करण्याचे उद्देशाने सोलापूर शहरात आलेल्या सराईत चोरट्यास पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. तो अक्कलकोट रोड पाण्याचे टाकी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. रेकॉर्डवरील सराईत चैन स्नॅचर गुन्हेगार सलीम शेख असं त्याचं नांव आहे. त्याने सोलापुरात दोन ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या जवळील शाईन कंपनीची मोटारसायकल (एम.एच.२१ बी.टी. ६१४१) चोरीची असल्याचेही निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
जतकर वस्ती ते प्रियांका चौकाकडे निघालेल्या अंबिका रवी पुजारी (वय २७ वर्षे व्यवसाय : मजुरी, रा. धोत्रेकर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) हिच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. ही घटना १९ जून २०२३ रोजी घडली होती. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दिवसाढवळ्या घडलेल्या जबरी चोरीची लोकवस्तीमध्ये घडल्याने या गुन्ह्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाच्या अनुषंगाने लक्ष केंद्रित केले होते. वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शन यांचा मेळ लावून तपास कार्य सुरू असताना, गुन्हे शाखेचे सपोनि मोरे व पथकाने मिळालेल्या विश्वसनीय खबरीनुसार सापळा लावून सराईत चैन स्नॅचर सलीम उर्फ सलीमोद्दीन अफजल शेख (वय ५३ वर्षे, मूळ रा. ९२/९०, प्लॉट नं. २, कासंबरी दर्गा जवळ, कासंबरी नगर औरंगाबाद. सध्या रा. सांजा रोड, धाराशिव) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने प्रियांका चौक आणि गतवर्षी जुळे सोलापुरात पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारुन चोरून नेल्याबाबतची कबुली दिली.
त्याचेकडे मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत तपास केला असता, त्याने ती मोटार सायकल जालना जिल्ह्यातील बदनापूर येथून चोरी केली असल्याची कबूली दिली. त्यास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह ०१ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सपोनि दादासो मोरे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार सफौ किर्दक, संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिद्धेश्वर देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, अंकुश भोसले, वसीम शेख, सायबर पो. स्टे. कडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.