सोलापूर : बचत खाते ब्लॉक होऊन होणारी अडचण टाळण्याच्या काळजीपोटी आलेली लिंक क्लिक करून प्रक्रिया पूर्ण केल्यावर खात्यावरील १६ हजाराहून अधिक रक्कम परस्पर काढण्यात आलीय. या आश्चर्यकारक घटनेत ही फसवणूक कायद्याचा अभ्यास असलेल्या वकिल साहेबांची झालीय. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिस ठाण्यात राजधानीतील ठकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामान्यांची सहजा-सहजी फसवणूक होऊ शकते, मात्र कायद्याचे जाणकारही फसू शकतात, हे या दाखल गुन्ह्याने पुढं आलं आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापुरातील शरद पवार शाळेजवळच्या अभिषेक नगरातील रहिवासी अॅड. प्रविण चंद्रकांत निकम यांना,
८४८४९६४५२९ या भ्रमणध्वनी क्रमांकावरुन आलेल्या मेसेजद्वारे, तुम्ही तुमचे के वाय सी तुमच्या स्टेट बँकेच्या खात्याशी संलग्न करा अथवा बचत खाते ब्लॉक करण्यात येईल' असे मेसेज प्राप्त झाले होते.
आलेल्या संदेशानुसार आपले बचत खाते ब्लॉक होऊन अडचण होऊ नये, याकरिता अॅड. प्रविण निकम यांनी, दुसऱ्या दिवशी, त्यांच्या मोबाईल मेसेज बॉक्समध्ये आलेली लिंक क्लिक करून पुढील प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या खात्यावरील १६, ८१६ रुपये काढण्यात आल्याचे मेसेज आले.
त्यानंतर अॅड. निकम यांनी वरील मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल स्विच ऑफ लागत होता. त्यावेळी आपली शनिवारी, १४ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले, या प्रकरणी अॅड. निकम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी नवी दिल्लीत राहणाऱ्या मोबाईल क्रं. ८४८४९६४५२९ चा धारक प्रल्हाद दुरा (गल्ली नं. ३, आया नगर, नई दिल्ली) याच्याविरुद्ध भादवि ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम क ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.