सोलापूर : किराणा दुकानातून दुधाचे पाकीट आणण्यासाठी घराबाहेर पडलेले ११ वर्षीय बालक घराकडे परत आले नाही. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कटकम वसाहतीत रविवारी सकाळी घडली. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आल्याने त्यास कशाचे तरी आमिष दाखवून अज्ञाताने अपहरण केले असल्याची फिर्याद दाखल झाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कर्णिक नगर लगतच्या कटकम वसाहतीतील रहिवासी श्रीपाद साळुंखे यांचा मुलगा सोहम, रविवारी, ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी घराजवळ असलेल्या दुकानात दूध पाकीट आणण्यासाठी गेला होता. तो घरी परत न आल्याने, त्याचा सोलापूर शहर तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.
त्याला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले असल्याचा संशय बळावल्याने श्रीपाद साळुंखे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार कलम ३६३ अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहृत सोहम चा रंग सावळा, अंगात चॉकलेटी कलरचा टी-शर्ट, निळी जिन्स पॅन्ट असून त्यास मराठी भाषा बोलता येते. त्याची उंची ४ फुट ३ इंच असून शिक्षण ४ थी इतके असे वर्णन आहे