सोलापूर : पोलीस हवालदाराच्या अल्पवयीन मुलाने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ह्रदयद्रावक घटना सोलापुरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अरविंद धाम सोसायटीत मंगळवारी दुपारी घडली. सोळा वर्षीय पृथ्वीराज गणपतसिंग चव्हाण असं मृताचे नाव असून त्याच्या आत्महत्त्येमागील कारण स्पष्ट झाले नाही.
अरविंद धाम सोसायटीतील ब्रह्मपुत्रा इमारतीतील रूम नंबर ४२ मध्ये वास्तव्यास असलेले पोलीस हवालदार गणपतसिंग चव्हाण यांचा मुलगा पृथ्वीराज यांनी सिलिंग फॅनला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच्या आप्तेष्टांनी त्यास खाली उतरविले. हा प्रकार दुपारी पावणेदोन च्या सुमारास घडला. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एन. सी. कामूर्ती यांनी दवाखाना यादीसह बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पृथ्वीराजला शासकीय इस्पितळात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.