सोलापूर : ऊसतोड कामगार आई-वडिलाबरोबर आलेल्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन ट्रॅक्टर चालकाने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याचा अन् त्यातून तिला दिवस गेल्याच्या आरोप न्यायालयात सिध्द झाल्याने विशेष न्यायाधीश श्रीमती कविता डी. शिरभाते (जिल्हा व सत्र न्यायाधीश- ३, सोलापूर) यांनी सतिश शिवाजी चव्हाण (रा. उमरगा) याला २५ वर्षे सक्त मजुरीची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, यातील फिर्यादी हा पिडीत मुलींचा वडील असून तो उसतोडीचा कामगार म्हणून काम करीत असतो. वळसंग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उसतोडीच्या कामाकरीता तो पिडीतेसह आपल्या कुटुंबासमवेत आला असता आरोपी त्या ठिकाणी टॅक्टरवर चालक म्हणून काम करु लागला. पिडीता ही ११ फेब्रुवारी २०२१ रोजी अचानक त्या ठिकाणावरुन मिळून न आल्याने पिडीतेच्या वडीलांनी दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पिडीता हरविल्याबाबतची फिर्याद दिली.
त्यानंतर पिडीता ही दि. १८ एप्रिल २०२२ रोजी आरोपीसोबत मिळून आली. त्यानंतर पिडीतेचा तपासकामी जबाब नोंदविला असता पिडीतेने यातील आरोपीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते, आरोपी हा विवाहीत होता, पिडीता ही अल्पवयीन होती, त्यामुळे त्यांच्या लग्नास विरोध होईल, म्हणून दोघे पळून गेले होते. पोलीसांनी शोध मोहीम सुरुच ठेवल्याने सदर शोध मोहिमेत पिडीता ही दि. १८ एप्रिल २०२२ रोजी आरोपी सोबत मिळून आली. त्यावेळी पिडीता ही ७ महिन्याची गर्भवती होती. त्यांनतर तपासी अमंलदार यांनी गुन्ह्याची चौकशी करुन, तपास टिपन नोंदवून वैद्यकीय कागदपत्रासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सदर प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश श्रीमती कविता डी. शिरभाते (जिल्हा व सत्र न्यायाधीश- ३, सोलापूर) यांच्या समक्ष होऊन यात सरकारतर्फे अॅड. प्रकाश एस. जन्नू यांनी पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने पिडीतेस पळवून घेऊन गेला व पिडीतेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्याद्वारे पिडीतेस लैंगिक छळ व अत्याचार केल्याचे व पिडीतेस झालेले अपत्य आरोपी व पिडीतेचे असल्याचे डी.एन.ए. च्या अहवालाद्वारे व साक्षी पुराव्याद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
याबाबत सरकारी वकील अॅड. प्रकाश एस. जन्नू यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन विशेष न्यायाधीश श्रीमती कविता डी. शिरभाते यांनी अल्पवयीन पिडीतेवर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे ग्राह्य धरुन आरोपी सतिश शिवाजी चव्हाण यास भा.द.वि. ३६३, ३६६-अ, ३७६) (२) (एन) तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ३, ४, ५ (जे) (२) (एन) अन्वये दोषी धरले.
आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ५ (जे) (२) (एल)(एन) अन्वये २५ वर्षे सक्त मजुरीची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच भा.द.वि. ३६३ अन्वये २ वर्षे सक्त मजुरी व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली, तसेच भा.द.वि. ३६६-अ अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली, तसेच पिडीतेस योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास आदेश केलेला आहे.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहा. सरकारी वकील अॅड. प्रकाश एस. जन्नू यांनी काम पाहिले. तर आरोपीच्या वतीने अॅड. अक्षय तोतला व अॅड. सतिश शेट्टी यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पो. कॉ./५७१/डी. वाय. कोळी यांनी काम पाहिले.
.........चौकट .........
... यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ०९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीता, फिर्यादी पिडीतेचे वडील, खाजगी वैद्यकीय अधिकारी, पिडीता, आरोपीचे व बाळाचे डी.एन.ए. नमुना घेणारे वैद्यकीय अधिकारी, त्याचप्रमाणे पिडीतेचे वयाबाबत शाळेचे मुख्याध्यापक व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली.
....... चौकट ..........
रासायनिक परीक्षण अहवाल महत्वाचा
या प्रकरणात रासायनिक परीक्षण अहवाल प्राप्त झाला असून त्या अहवालाद्वारे पिडीतेस झालेल्या बाळाचे आरोपी व पिडीता हेच वडील व आई असल्याचे अभिप्राय दिल्याने आरोपीने पिडीतेवर अत्याचार केल्याचे व पिडीता घटनेच्या वेळेस अल्पवयीन असल्याचे साक्षी पुराव्याद्वारे सिध्द केले.