सोलापूर : सध्या जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाच्या छाननी प्रक्रिया सोमवारी, २३ रोजी झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील सरपंच पदाचे दावेदार यशपाल श्रीकांत वाडकर यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केली.
यशपाल वाडकर यांचे दोन विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत नाव असल्याचे कारण पुढे करत प्रतिस्पर्धी उमेदवार शंकर मच्छिंद्र वाडकर यांनी आक्षेप नोंदवला, तथापि प्रतिवादीचे वकील अॅड. शरद पाटील यांनी दाखवलेले सक्षम पुरावे ग्राह्य मानून ग्रामपंचायत अधिनियम व राज्य निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशान्वये सादर केलेले नामनिर्देशन पत्र योग्य असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी अमर खटके यांनी दिला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवची ग्रामपंचायत प्रतिष्ठेची मानली जाते. कासेगांव च्या निवडणुकीत दोन्ही गटाकडून चुरशीने रणणिती आखली जात आहे. माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य लोकरत्न स्व. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांचे राजकीय वारसदार म्हणून यशपाल वाडकर यांची जनमाणसांत ओळख आहे. या रणधुमाळीच्या प्रारंभी विरोधकांनी नोंदविलेली हरकत चुकीची असल्याच्या निर्णयाकडे त्या गटात जमेची बाजू म्हणून पाहिलं जात आहे.