सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल विक्रीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना मुद्देमालासह वेगवेगळ्या ठिकाणी पकडण्यात आले. त्यांच्या झडतीत उभयतांकडून चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील एक मोटर सायकल आणि सोन्याचे दागिने मिळून ०१ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याचे माहिती कक्षातून सांगण्यात आले.
एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोसई विक्रम रजपूत यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने घरफोडी चोरी दाखल असलेला गुन्हेसंदर्भात गुप्त बातीमादारांकडून पोकॉ/१४८३ वाघे यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे, त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावून थांबले असता, सोन्याचे दागिने विक्री करण्याचे उद्देशाने आलेल्या एका इसमास, पोलीसानी जागीच पकडले.
त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, तो विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये घरफोडी चोरीतील ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पेंडल व मणी असलेले गंठण, ५५ हजार रुपये किंमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस असा एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गुन्हा १२ तासाच्या आत उघड करण्यात आला.
एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल होता, त्याअनुषंगाने मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, सिध्दारुढ मठाजवळ एक इसम चोरीतील मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याचे पोकॉ/१५८७ याळगी कळाल्यावर त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावला असता, तेथे एक इसम मोटारसायकलवर आला. त्यास पथकाने सापळा लावून जागीच पकडले. त्याचेजवळील मोटारसायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता, ती मोटारसायकल एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेल्याचे माहिती मिळाली.
या आरोपीच्या ताब्यातून यामाहा कंपनीची काळ्या रंगाची ही मोटार सायकल चोरणारा आरोपी ईश्वर श्रीनिवास बिरु (वय - १९ वर्षे, रा. शांतीनगर पोलीस चौकीच्या पाठीमागे, सोलापूर) यास अटक करुन त्याच्याकडून ६० हजार रूपये किंमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली.
आरोपीत विधीसंघर्षबालक याच्याकडुन ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी नामे ईश्वर श्रीनिवास बिरु याच्याकडून ६० हजार रूपये किंमतीची एक मोटार सायकल असा १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पो.नि. शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक विक्रम रजपुत, पोहेकॉ राकेश पाटील, नाना उबाळे, दिपक डोके, सचिन भांगे, पोना, मंगेश गायकवाड, शैलेश स्वामी, सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, दिपक नारायणकर, अमोल यादव, अमसिध्द निंबाळ, देवीदास कदम, भारतसिंग तुक्कुवाले यांनी पार पाडली.