अस्तित्व लपवून राहत असलेला आरोपी १० वर्षानंतर गजाआड

shivrajya patra
प्राणघातक शस्त्रांच्या धाकाने घातला होता दरोडा 

सोलापूर : आपल्या वस्तीवर झोपलेल्या कदम कुटुंबीयांच्या घरात घुसून त्यांना तलवार व चाकू अशा प्राणघातक शस्त्राचा धाक दाखवून सुमारे पावणे तीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड जबरीने चोरून नेले होते. याप्रकरणी करकंब पोलिसांनी गेल्या दहा वर्षांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बिभीषण शरद काळे याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे.
 
 करंकब पोलीस ठाणेच्या हद्दीतील मौजे बादलकोट गावातील कदम वस्ती येथे राहणारे अंकुश कदम हे आपल्या कुटूंबासह वस्तीवरील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकू व तलवारीचा धाक दाखवून घरातील २ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम जबरी चोरी करून घेऊन गेले होते. हा थरारक प्रकार ०२ ऑक्टोबर २०१३ रोजी मध्यरात्री घडला होता.

 करंकब पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी केला. त्यांनी  या गुन्ह्यात १० आरोपी निष्पन्न करून त्यातील ९ आरोपींना गजाआड करून त्यांच्याविरूध्द दोषारोप पत्र दाखल केले होते. या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी बिभीषण शरद काळे (वय ३७, रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर) हा गुन्हा घडल्यापासून स्वत:चे अस्तित्व लपवून राहत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. 

पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीस अटक करणे संबंधी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी केलेल्या मार्गदर्शनावरून पोउनि सुबोध जमदाडे व त्यांच्या पथकाने तो आरोपी कोथाळे ते इचगाव या रस्त्यावरून मोटार सायकलवरून जाणार असल्याची गोपनिय माहिती काढली होती. त्या अनुषंगाने पोउनि जमदाडे यांच्या पथकाने सापळा लावला होता. तो आरोपी हा मोटार सायकलवरून आला असता, त्यास ताब्यात घेऊन त्यास पुढील कार्यवाहीसाठी करकंब पोलीस ठाणेस हजर केले आहे. तो मालाविषयी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याचेविरूध्द दरोडा जबरी चोरी व चोरी अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस निरीक्षक हिंमत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर (स्था.गु.शा. सोलापूर ग्रामीण) यांच्या नेतृत्वाखाली पोउनि सुबोध जमदाडे, श्रेणी पोसई बिराजी पारेकर, सहा.फौ. शिवाजी घोळवे, पोह प्रकाश कारटकर, पोना रवि माने, पोकॉ अजय वाघमारे, अन्वर आत्तार, सुरज रामगुडे, प्रमोद माने यांनी पार पाडली.



To Top