सोलापूर विद्यापीठात प्रजासत्ताक पथसंंचालन निवड चाचणी शिबिराचा समारोप
सोलापूर/२९ सप्टेंबर : भारत हा तरुणांचा देश म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहे. भारत विकसित देश म्हणून नावारूपास येण्यासाठी युवकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित तीन दिवसीय राज्य व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिराचा समारोप प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे क्षेत्रीय संचालक श्री अजय शिंदे, राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, परीक्षक डॉ. सुशील शिंदे, डॉ. रमेश देवकर, एनएसएसचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. मल्लकार्जुन करजगी, वित्त व लेखा अधिकारी सीए श्रेणिक शाह, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदींची उपस्थिती होती.
प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, प्रशिक्षण या तीन बाबी मानवी विकासासाठी खूप आवश्यक आहेत. मानवी विकासाचा भारताच्या निर्देशांकाचा क्रमांक हा १०० च्या पुढे येतो. पहिल्या शंभरमध्ये मानवी विकासाचा भारताचा निर्देशांक आणून भारताला महासत्ता बनवण्यासाठी युवकांनी योगदान देणे महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातही भारताची टक्केवारी वाढवणे अतिशय गरजेचे आहे.
आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यभरातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी पथसंंचलन प्रशिक्षणासाठी येऊन शिबिरात भाग घेतले. आता देशाच्या सेवेसाठी युवकांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. कोठावळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्रशिक्षण शिबिराचे अतिशय सुंदर नियोजन केल्याचे सांगून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी यापुढे शंभर टक्के सादरीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. अजय शिंदे यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरासाठी पथसंचालनाकरिता विद्यार्थ्यांची निवड यादी तयार झाल्याचे सांगून राष्ट्रीय सेवा योजनेमुळे समाज व देशसेवेसाठी आपण जोडले जातो, असे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना तसेच संघप्रमुखांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्यजित चव्हाण आणि श्लोक वरवडे या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कल्पना जाधव, नितीनकुमार माळी या संघप्रमुखांनी तसेच शांतीश्वर दाभाडे, अक्षता देशपांडे, गौरी गुरुडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सुंदर नियोजनाबद्दल प्रशंसा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमोल बोगडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर डॉ. राजेंद्र वडजे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित तीन दिवसीय राज्य व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व पथसंचलन राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर समारोपात प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थी व संघप्रमुखांचा सन्मान करण्यात आला.