१० सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

shivrajya patra

गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्यासह प्रमुख मागण्या 
सोलापूर : बहुजन महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या मनोहर कुलकर्णी उपाख्य संभाजी भिडेला अटक करावी, जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याला जबाबदार असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने रविवारी, १० सप्टेंबर रोजी दुपारी ०३ वा. पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघणार असल्याची माहिती एका पत्रकान्वये देण्यात आली आहे. 

हा महामोर्चा पुणेस्थित लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला धडकणार आहे. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, राज्य प्रचारक सचिन बनसोडे आणि प्रदेश अध्यक्षा प्रतिभा उबाळे या महामोर्चाचे नेतृत्व करीत असल्याचेही सांगण्यात आले.

बहुजन समाजातील आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या दत्तवाडी (पर्वती पोलीस स्टेशन) चे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकात कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, पुण्यातील 'बालगंधर्व' मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ब. मो. पुरंदरेचा पुतळा लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, धार्मिक अल्पसंख्याक व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी संविधानिक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानवीय लाठी हल्ल्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, या महामोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत. 

मणिपुर येथील महिलांवर झालेला अत्याचार व हिंसाचारावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत नाहीत. देशभरात वाढत असलेली बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धार्मिक अल्पसंख्याक यांच्यावर वाढत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे बहुजन समाजातील लोकांच्या मनामध्ये रोष निर्माण होत आहे,  बहुजनांचा आवाज बंद करण्यासाठी बहुजन समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या विरोधात हा महामोर्चा निघणार आहे.

बहुजन समाजाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी हा महामोर्चा निघत आहे. आपल्या प्रमुख मागण्या मांडण्याबरोबर शासनाला जाब विचारण्यासाठी बहुजन समाजाने या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही भारत मुक्ती मोर्चा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने ही करण्यात आले आहे.
To Top