सोलापूर : जमिनीची मोजणी होऊन त्याबाबतच्या हद्दी कायम करून नकाशाचे प्रिंट देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना करमाळा भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक (वर्ग-३) खंडू मारुती रेंगडे (वय-४७ वर्षे) याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने सोमवारी, रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या आईच्या नावे मौजे मोरवड येथील गट नं.९१ चा ९१/१ मधील १ हेक्टर ३१ आर जमीनीची मोजणे होऊन त्याबाबतच्या हद्दी कायम करुन नकाशाची प्रिंट मिळणेबाबत दि. १७.०१.२०२२ रोजी तातडीचा अर्ज देऊन त्याबाबतचे शासकिय शुल्क ३ हजार रुपये चलनाद्वारे भरले होते.
तक्रारदार यांनी शासकिय फी चलनाव्दारे भरलेली असताना देखील यातील उप अधीक्षक करमाळा भुमिअभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक खंडू रेंगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मोजणी करुन हद्द कायमचा नकाशा प्रिंट काढणेकामी व इतर कागदपत्रे तयार करण्यास लागणाऱ्या खर्चासाठी तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी २५ सप्टेंबर रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, यातील आरोपी लोकसेवक खंडू रेंगडे यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नावे असलेल्या शेत जमीनीची मोजणी करुन त्याबाबतचा हद्द कायमचा नकाशाची प्रिंट व इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रूपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती अडीच हजार रुपये लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशन (सोलापूर ग्रामीण) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे (लाप्रवि, पुणे), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (लाप्रवि, पुणे), सहा. पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार (लाप्रवि, सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी (लाप्रवि, सोलापूर) पोलीस अंमलदार- पोह/प्रमोद पकाले, पोकॉ/गजानन किणगी, चापोकॉ/ शाम सुरवसे (सर्व नेमणूक : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर) यांनी पार पाडली.