विश्वकर्मा योजना शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : केंद्र शासनाने पारंपारिक १८ व्यवसायिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली आहे. शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन पारंपारिक व्यवसायिकांनी आपली आर्थिक प्रगती करून घ्यावी, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम कर्ज विभागाचे वरिष्ठ प्रबंधक समीर माढेकर यांनी केले.
येथील पूर्व विभाग सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व सोलापूर जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, सायंकाळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना शिबिराचे मार्गदर्शन शिबीर व चर्चासत्र पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय येथे पार पडले. या प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे पहिले मार्गदर्शन शिबीर घेण्याचा मान पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाला मिळाला. पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने हा अभिनव उपक्रम घेतल्याप्रित्यर्थ अभिनंदन करून समीर माढेकर यांनी या योजनेसाठी नोंदणी कुठे करायची, योजनेचे प्रशिक्षण कशा पद्धतीने असेल, यासंबंधीची विस्तृत मांडणी करताना योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्व विभाग मध्यवर्तीचे सचिव अक्षयअंजिखाने यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी या मार्गदर्शन शिबिरास उपस्थित प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले.
या प्रसंगी कार्यक्रमास पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी पांडुरंग काका दिड्डी, अध्यक्ष संजय साळुंखे, सचिव अक्षय अंजिखाने, सल्लागार नागेश गंजी, सिनेट सदस्य यतीराज होनमाने, अरविंद चिन्नी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत जिंदम, शिलवंत छपेकर, किरण वल्लाल, सुरेश यल्लाराम, रोहन श्रीराम, रमेश पांढरे, प्रशांत पवार आदींनी परिश्रम घेतले. शेवटी अध्यक्ष संजय साळुंखे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.