जळगाव शहरातील नागरी सुविधा मिळाव्यात, असे अनेकांना वाटते. बोलतात पण... त्या कशा मिळतील ?असे रडून कढून बोटे मोडून तोंड वेंगाळून दुषणे देऊन मिळणार नाहीत. त्यासाठी समर्थपणे पुढे यावे लागेल. आपले अस्तित्व दाखवावे लागेल, म्हणून धाडसाने बोला...विचार मांडा.
जळगाव शहरातील रायसोनीनगर, शिवाजीनगर, रामेश्वर कॉलनी, खोटेनगर, गोपालपुरा, राजमालतीनगर, कांचननगरमधील नगरसेवकांची भुमिका अनुभवली आहे. नगरसेवकांना भ्रम झाला आहे की, हा इलाका माझा आहे.मी येथील दादा आहे.मला विचारल्याशिवाय कोणीही येथे काम करू नये. सभा बैठक घेऊ नये. कोणीही मक्ता घेऊ नये, हा निधी माझा आहे. मी टक्केवारी देऊन आणलेला आहे...हे भयानक अनुभव सुन्न करणारे आहेत.
नगरसेवकांची ही मुजोरी, दादागिरी, खाबुगीरी कमीशनखोरी, टक्केवारी आपण मोडून काढणार आहोत. त्यासाठी चाकू - सुरी, पिस्तूलची गरज नाही. विचारांची, तत्वांची, कृतीची गरज आहे. येथेच आपण जळगावचे नागरिक कमी पडत आहोत, ती कमी आम्ही ओळखून भरून काढत आहोत.
आम्ही शहरातील अनेक प्रभागामध्ये गेलो. तेथे जागृत जनमंचचे होतकरू, धाडसी सदस्य आहेत. तरीही नगरसेवक अजूनही 'गॅंगस्टर' सारखे वागत आहेत. ही अवस्था भयानक, विदारक, हानीकारक आहे. हे चित्र आपण बदलणार आहोत.
जळगाव शहरातील अनेक उच्चशिक्षित लोक अजूनही दबक्या आवाजात तक्रार करतात, दडपणाखाली वावरतात. मला वाटते, जो फुकटचे राशन, सिलेंडर, शौचालय, घरकुल घेतात त्यांची अवस्था भयग्रस्त असू शकते. त्यांचा मेंदू पोटात असतो. पण, डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर, वकिल व्यापारी यांचा मेंदू तर डोक्यात असावा. त्यांनी तरी अशा भयग्रस्त अवस्थेत असू नये, समोर येण्यात भीती कशाची ? इतकी दहशत कोणाची? जर दहशतीखाली असाल तर तुमच्या बुद्धीचा, शिक्षणाचा, कौशल्याचा काय उपयोग ?
जळगावमधील अभिजात लोकांनी रस्ता अडवू नये. पुतळा जाळू नये. बैनरला चप्पल मारू नये, ते काम बिनडोक लोक किंवा भाडोत्री लोक करतात. मात्र आपण सुबुद्ध लोकांनी किमान विचार तरी खुलेपणाने मांडले पाहिजे, त्यासाठीच आम्ही जळगाव जागृत जनमंच बनवला आहे.
काही उच्चभ्रू लोकांना वाटत असेल की, कोण हे लोक, माजलेल्या राजकारणी लोकांना टक्कर देणारे ? गडगंज श्रीमंत विरोधात कसे लढतील ? विरोधकांकडे खूप पैसा आहे. असा विचार करणे म्हणजे लढाई आधीच पराभव स्वीकारणे असते. जर असाच विचार टिळक, गांधी, नेहरू, नेताजी यांनी केला असता तर ? स्वातंत्र्य मिळाले असते का ? त्यांनी व्यवसाय सोडून आंदोलन केले.जेलमधे गेले. तर मग, ते काय अशिक्षित होते काय ? ते काय रिक्षा, टॅक्सी चालवत होते काय ? त्यांचे कुठे दारूचे दुकान होते काय ?त्यांचे कुठे परमिट बार होते काय ? त्यांचे कुठे डान्सबार होते काय ? त्यांचा रेतीचोरीचा धंदा होता काय ? ते काय खंडणी जमा करून गणपती बसवत होते काय ? ते काय खंडणी जमा करून नवरात्रीला नाचत होते काय ? स्वातंत्र्याची लढाई बुद्धिमान, उच्चशिक्षित लोकांनी लढलेली आहे.आणि तुम्ही ? बुद्धिमान असणे, उच्चशिक्षित असून उपयोग काय ?
शिक्षक, प्रोफेसर, अधिकारी, डॉक्टर, वकील यांनी उतारवयात तरी समाजाचे ऋण फेडण्यासाठी वेळ दिला पाहिजे. हा समाज, हे राजकारण, हे प्रशासन टिकवून ठेवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तुम्ही पैसे कमवण्याचा लोभात मरेपर्यंत असाल तर बुद्धीचा, ज्ञानाचा काय उपयोग ?पैसा तर गंगूबाई काठियावाडी सुद्धा कमवत होती. पण अन्याय विरोधात धाडस करीत होती, लढत होती.म्हणून तर प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिची दखल घेतली. भेटीला बोलवून तिची फिर्याद ऐकून घेतली होती.वस्तीवरील बुलडोझर थांबवला होता, हे तिच्या पैशांचे नव्हे , तिच्या धाडसाचे मोल होते. सांगा,असे धाडस तुम्ही कधी कराल? तुम्ही सोडून गेल्यावर नेरी नाक्यावर मी येईन. काय सांगू?
" आमचे हे मित्र आयुष्यभर अधाशीपणे पैसा कमवत होते. त्यातच त्यांचा अंत झाला. मी ईश्वराला प्रार्थना करतो की, त्यांना ईश्वर चरणी चिरशांती लाभो. पुन्हा पृथ्वीवर नका पाठवू. येथे ते कोणाच्याही कामी आले नाहीत."
... शिवराम पाटील,
महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव.
९२७०९६३१२२