माजी आमदार रमेश कदम यांचे एकरूख गावात जल्लोषात स्वागत

shivrajya patra
उत्तर सोलापूर/कय्युम जमादार 
' मागेल त्याला पाणी अन् मागाल तेथे रस्ता ' या कार्यप्रणालीमुळे मोहोळ आणि जिल्ह्याच्या राजकीय चर्चेत राहिलेले तत्कालिन राज्यमंत्री रमेश कदम यांनी यांनी आपल्या झंझावाती जनसंपर्क अभियानात एखरुख गावाला भेट दिली. ग्रामस्थांनी हर्षोल्हासात स्वागत करून त्यांचा सत्कार केला.

मोहोळ विधानसभा मतदार संघाला उत्तर सोलापूर तालुक्यातील जी गांव संलग्न आहेत, त्यापैकी तलावाच्या काठावर वसलेल्या एखरुख गावाची स्थिती उन्हाळ्यात 'धरण उशाला अन् कोरड घशाला' अशीच होती. जिल्ह्याच्या राजकीय सारीपाटावर मोहोळ विधानसभा मतदार संघाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठांनी जो नवा चेहरा दिला, त्यांचं नांव रमेश कदम ! 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील नेत्यांना जाणणाऱ्या सर्वसामान्य मतदारांनी त्यांचा शब्द प्रमाण मानून एक नवखा चेहरा आमदार  केला ते रमेश कदम ! राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो अन् कोणाचा पिढीजात शत्रू नसतो असं वारंवार म्हटले जाते. त्यातही शह-काटशहाच्या राजकाणात आरोप-प्रत्यारोप होत राहतात. ते अगदी 'नेमेचि येई पावसाळा' प्रमाणे असतं. 

अशा शह-काटशहाच्या राजकाणात राज्य मंत्री असलेल्या रमेश कदमांनाही कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागले.
त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना चार भिंतीच्या आड असलेल्या वेगळ्या जगाला अनुभवावे लागले. गेल्या ८ वर्षाचा काळाचा पडदा एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे मागे सरकत गेला. या काळात मतदारसंघात सरकारच्या घोषणांपेक्षा रमेश कदमांचा ' मागेल त्याला पाणी अन् मागाल तेथे रस्ता' हा कृति कार्यक्रम आजही सामान्यांच्या स्मरणात असल्याचा हा सत्कार सोहळा त्याचा दाखला होता. त्यांचा कृति कार्यक्रम एकुरखकरांनी प्रत्यक्ष अनुभवला होता.

माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार रमेश कदम हे तब्बल आठ वर्षानंतर चार भिंतीच्या बाहेर आले. त्यांच्याविषयी आस्था असलेल्या सामान्यांतील आपुलकी अनुभवण्यासाठी आपल्या मतदार संघात गावोगावी भेट देत आहेत. त्या निमित्ताने शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी त्यांचा गाव दौरा एखरूख चा ! त्या निमित्ताने सकाळी ११ वाजता ते आले. 

कय्युम जमादार व रौफ जमादार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, माजी आमदार रमेश कदम यांचं ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. माजी आमदार कदम यांनी सत्काराला उत्तर देताना, आपला प्रतिनिधी म्हणून कार्य करीत असताना, सार्वजनिक हिताची कामे करीत असताना आलेल्या समस्यांना त्यांनी कशा पद्धतीने सोडवल्या, यावरही ओझरता प्रकाशझोत टाकला. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आता सुद्धा कायम आहे, हे पाहून ते भारावून गेले होते. 
या कार्यक्रमात माजी सरपंच हबीब जमादार, शहाजी उडाणशिवे, अप्पा उडाणशिवे, जावेद जागीरदार, जावेद पटेल, अन्सर जमादार, इमाम जमादार, भैरवनाथ चव्हाण, गणपत भोरे, आदिनाथ उडानशिवे, शिवा कांबळे, एजाज जागीरदार, नसिर जमादार, निजाम जमादार, चंद्रकांत भोरे, सिकंदर जमादार आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद पटेल यांनी केले व त्यांनीच सर्व उपस्थितांचे आभार मानले.
To Top