"... आरोग्यम् धनसंपदा"पोलीस प्रशिक्षण केंद्रात १४५० पोलीस प्रशिक्षणार्थीसाठी आरोग्य तपासणी

shivrajya patra
"... आरोग्यम् धनसंपदा"

पोलीस प्रशिक्षण केंद्रात १४५० पोलीस प्रशिक्षणार्थीसाठी आरोग्य तपासणी 
असं म्हटलं जातं की, आरोग्य हेच सर्वात मोठे धन आणि आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती होय. निरोगी आयुष्य जगत असताना जीवनातील धावपळ आणि कामाच्या वेळेतील अनिश्चितता परिणामी आहार-विहार यात होणारी अनियमितता ही मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करत असते. याकरिता सातत्याने आरोग्याची तपासणी आणि त्यावर योग्य ती उपाययोजना केल्यास ही आपली धनसंपदा चांगली सुदृढ राहू शकते. 
आपल्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होते. हीच भावना मनाशी ठेवून पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूरच्या प्राचार्या डॉ. वैशाली कडूकर यांनी सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय आणि सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवप्रविष्ट पोलीस शिपाई बॅच क्रमांक २४ च्या एकूण १४५० पोलीस प्रशिक्षणार्थीसाठी आरोग्य तपासणी शिबिर रविवारी, १० सप्टेंबर रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूरमध्ये आयोजित केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य अनुराधा उदमले यांनी केले.आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांनी मानवी आरोग्याचे महत्त्व विशद केले तसेच उत्तम आरोग्यासाठी वैद्यकशास्त्रातील traditional wisdom and modern wizardry यांची सांगड व उपयोगिता स्पष्ट केली. 
सदरच्या कार्यक्रमात डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय डॉ. सुधीर देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आरोग्याचे महत्त्व थोडक्यात पण सोप्या भाषेत स्पष्ट केले. सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. स्वामी यांनी देखील आरोग्य विषयक बाबींचा उहापोह केला. याप्रसंगी माननीय डॉ. अरुणा सुधीर देशमुख तसेच दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता माननीय डॉ. मीना काशेट्टी मॅडम उपस्थित होत्या. 
सदर शिबिरासाठी तिन्ही वैद्यकीय महाविद्यालयातील आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील १२० डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करण्यात आला होता. या शिबिरादरम्यान सर्व लाभार्थी यांना त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारीवर योग्य ते निदान आणि उपचार करण्यात आले. 
प्रशिक्षण केंद्रात हजर झाल्यानंतर सुरुवातीचा प्रशिक्षण कालावधी हा खडतर असतो. या कालावधीत जुळवून घेताना प्रशिक्षणार्थींना छोट्या-मोठ्या शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. अशा महत्त्वाच्या कालावधीत हे शिबीर आयोजित केल्याने त्याचा प्रशिक्षणार्थी यांना निश्चितच मोठा उपयोग होईल. शिबिरात मेडिसिन विभाग, शल्य चिकित्सा विभाग, कान-नाक-घसा शास्त्र विभाग, अस्थिरोगशास्त्र विभाग, नेत्ररोग शास्त्र विभाग, दंतशास्त्र विभाग आणि आयुर्वेद विभाग यामध्ये सर्व तपासण्या करून सर्वांचे BMI, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तातील शर्करेचे प्रमाण, रक्तातील चरबीचे प्रमाण,  लघवीची तपासणी करण्यात आली. 
या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी, कवायत निदेशक आणि सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे स्वागत आणि सुत्रसंचलन पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी केले.
To Top