कासेगाव/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समवेत आमच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद घडला. त्यांच्या भावना आम्हाला जवळून समजून घेता आल्याचे फार मोठे समाधान आम्हाला वाटते, असे प्रतिपादन राजकुमार उंबरजे यांनी केले.
सोलापूर येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेच्या वतीने शिक्षक भगवान चौगुले यांच्या संकल्पनेतून "दिव्यांग मित्र " उपक्रम अंतर्गत सिध्देश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी आप्पासाहेब काडादी जयंती सप्ताहानिमित्त सिध्देश्वर प्रशालेचे विद्यार्थी मंत्रीमंडळ 'दिव्यांगाच्या दारी' हा नाविन्यपूर्ण उपक्रम गुरुवारी राबविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार उंबरजे बोलत होते.
सिध्देश्वर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मन्मथ उकरंडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी महत्त्वाच्या अनेक टिप्स दिल्या.
यावेळी निलेश दंतकाळे, रवींद्र कबाडे यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमात सहभागी झालेले सिध्देश्वर प्रशालेचे विद्यार्थी मंत्रीमंडळातील मुख्यमंत्री ओम खेड, उपमुख्यमंत्री श्रीयश आयवळे, शिक्षणमंत्री सुदीप वळसंग, विज्ञान मंत्री ओंकार मणुरे, पर्यावरण मंत्री अनुप ढगे, सांस्कृतिक मंत्री आयुष उखळे, गृहमंत्री प्रतिक वडतीले क्रीडामंत्री, अमेय कलशेट्टी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करत वह्या पेन व सचित्र तक्ते आदी शैक्षणिक वस्तू भेट देऊन 'आम्ही पुन्हा येऊ' असं अभिवचन देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त मन्मथ उकरंडे यांचा मुख्याध्यापक अरविंद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते राजेश माळवदकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे राजकुमार उंबरजे व इतर मान्यवर तसेच विद्यार्थी मंत्र्यांचा शामराव वाघमारे व दिव्यांग विद्यार्थ्यांनी सन्मान केला. अय्यान तांबोळी या दिव्यांग विद्यार्थ्यांने हाताने काढलेल्या आप्पासाहेब काडादी यांच्या रेखाचित्राबद्दल मान्यवरांनी कौतुक करत त्याचा विशेष सन्मान केला.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन समन्वयक भगवान चौगुले यांनी तर आभार बालाजी दिकोंडा यांनी मानले. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी जयंती सप्ताहनिमित्त स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळाच्या सचिवा लक्ष्मीबाई इटकर, श्रीनिवास इटकर, मुख्याध्यापक इरफान चौधरी, संजीवकुमार इटकर, मतिमंद समन्वयक सुरेश इटकर यांनी सिध्देश्वर प्रशालेस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इक्बाल जमादार, श्रीनिवास पवार, राजेश संदुपटला, समर्थ राऊत, शिवाजी कांचने, उमर शेख, उमेश परीट, मदीहा मुल्ला, मेहराज कोथिंबीरे, सानिया पटेल, बिबीजान नाईकवाडी, समरसिंग जुणी यांनी परिश्रम घेतले.