समन्वयाचा अभाव; दिव्यांग ताटकळत राहिले !
सोलापूर : जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व आवश्यकतेनुसार लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभाग 'दिव्यांगांच्या दारी' हे अभियान संपूर्ण राज्यात राबविले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी या अभियानाचा कार्यक्रम बुधवार दि. २० रोजी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी आयोजित करण्यात आला. या महाशिबीरात अपेक्षेहून अधिक दिव्यांगानी हजेरी लावल्याने मोठा प्रतिसादावर शिक्कामोर्तब झाले. मात्र महाशिबीरात समन्वयाचा अभाव राहिल्याने दिव्यांग ताटकळत राहिले. त्यात नोंदणी फॉर्म मिळवण्यासाठी धडपड करून ते उपलब्ध न झाल्याने दिसून आले.
शासनाच्या दिव्यांग प्रशासन, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात ' दिव्यांगाच्या दारी' अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे राज्याचे अध्यक्ष ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने दिव्यांगासाठी उत्सुकतेचा कार्यक्रम होता. त्यांनीच राज्य सरकारची वेळोवेळी संघर्षमय भूमिका घेऊन दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती करून घेण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळे नामदार बच्चुभाऊंना भेटण्याची त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्याची अनेकांची ओढ असल्याचे दिसून आले.
शासनाच्या विविध योजना राबवित असताना दिव्यांग लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी, हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण राज्यात हे अभियान सुरु आहे. सोलापुरात आयोजित अभियानात नोंदणी फॉर्म संप संपल्याने अनेक दिव्यांगाना नोंदणीपासूनही वंचित राहावे लागले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सार्थी पुणे विभागीय कार्यालय, पुणे, जिल्हा समाज कल्याण सोलापूर,व्यवस्थापक - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सोलापूर, श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस अंध व अपंग दिव्यांगासाठी कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर, रेल्वे विभाग, तहसीलदार संजय गांधी निराधार योजना विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, जिल्हा व्यवस्थापक एस.टी. महामंडळ सोलापूर,सोलापूर महानगरपालिका सोलापूर दिव्यांग कल्याण विभाग, शासन आपल्या दारी जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर,
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सोलापूर, एलिम्को,
सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र सोलापूर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर, म्हाडा, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय सोलापूर, जिल्हा व्यवस्थापक महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, व्यवस्थापक दिव्यांग वित्त व विकास महामंडळ सोलापूर, व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सोलापूर,
व्यवस्थापक संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ सोलापूर, व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ सोलापूर, व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ सोलापूर, व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ सोलापूर यांचे योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या लाभासाठी समुपदेशन करणे यासाठी जवळपास २२ स्टॉल लावण्यात आले होते.
कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन परिसरात महा अभियानास ये येणाऱ्या दिव्यांग बांधवांचे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालय सोलापूर यांचे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनपूर्वक गर्दी टाळली. सांस्कृतिक भवनाच्या परिसरात दूरपर्यंत पार्किंग केल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही. दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची त्याचबरोबर भोजनाची व्यवस्था केली होती.