मतिमंद पिडीतेशी दुष्कर्म करण्याचा प्रयत्न; ५ वर्षे सक्तमजुरी

shivrajya patra
सोलापूर : मतिमंद अल्पवयीन पिडीतेशी दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने येथील विशेष न्यायाधीश (३) श्रीमती कविता शिरभाते यांनी दोषी मल्लप्पा उर्फ मल्लीनाथ शिवप्पा बिराजदार, (वय - ४२ वर्षे, धंदा- नोकरी, रा. सोलापूर) याला पाच वर्षे सक्त मजुरी आणि अन्य कलमाखाली दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पिडीता मतिमंद असल्याने घरी ठेवून कामाकरीता गेली असता, मल्लप्पा उर्फ मल्लीनाथ शिवप्पा बिराजदार, हा पिडीतेस घेऊन जात असल्याचे पाहून, परिसरातील रिक्षा चालकाने तिच्या आईस त्याची कल्पना दिली. तिने, पिडीता व आरोपीचा शोध घेतला असता त्यावेळेस आरोपी हा मतिमंद पिडीतेशी दुष्कर्म करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जोरात ओरडल्याने मल्लाप्पा उर्फ मल्लिनाथ पिडीतेस सोडून पळून गेला. हा प्रकार १८ जानेवारी २०२२ रोजी घडला.

याप्रकरणी पिडीतेच्या आईने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपासिक अमलदार पी. एस. आय. चक्रधर ताकभाते यांनी आरोपी मल्लप्पा उर्फ मल्लीनाथ शिवप्पा बिराजदार, (वय - ४२ वर्षे, धंदा- नोकरी, रा.सोलापूर) याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते यांचे न्यायालयात झाली. आरोपी हा पिडीतेस घेऊन जात असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने फिर्यादीस माहिती दिली व फिर्यादीने ताबडतोब त्याचा शोध घेतला, आरोपी हा पिडीतेवर दुष्कर्म करण्याचे प्रयत्नात असल्याचे फिर्यादीने पाहिले आहे. ही घटनेवेळेस हजर नसल्यास पिडीतेसोबत आरोपीने अमानुष कृत्य केले असते, असा सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. प्रकाश जन्नू यांनी युक्तीवाद केला.

 न्यायालयात केलेल्या युक्तिवाद व साक्षी पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने साक्षी पुराव्याद्वारे सिध्द केल्याचा केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मा. न्यायालयाने आरोप सिध्द मल्लप्पा उर्फ मल्लीनाथ शिवप्पा बिराजदार याला दोषी धरले.


या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी (पिडीतेची आई), प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनेच्या वेळेस फिर्यादी काम करीत असलेले मालक, वैद्यकीय अधिकारी व तपासी अमंलदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

 न्यायालयाने दोषी धरुन मल्लप्पा उर्फ मल्लीनाथ शिवप्पा बिराजदार याला भा.द.वि. कलम ३५४, ३५४-ब, तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ७, ८, ९–के, १०, ११ व १२ अन्वये दोषी धरुन आरोपीस ५ वर्षांची सक्तमजुरी व र.रु. १००० दंडाची शिक्षा सुनावली, दंड न भरल्यास १५ दिवस कैदेची शिक्षा सुनावली. 

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. प्रकाश सु. जन्नू व आरोपीतर्फे अॅड. रेवण पाटील यांनी काम पाहीले, तर कोर्ट पैरवी म्हणून पो.. कॉ./१७९४, रफिक तांबोळी यांनी काम पाहिले.


To Top