सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी राबवलेल्या मोहिमेत हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकले. मोटरसायकलीवरून वाहतूक होणारी ३२० लिटर हातभट्टी दारूही पकडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू विरोधात सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून शुक्रवारी विभागाच्या भरारी पथकाने शहरातील राघवेंद्र नगर येथे गणपत राम पवार (वय ५० वर्षे, रा. गणपत तांडा, बक्षीहिप्परगा) हा त्याच्या टीव्हीएस कंपनीच्या ज्युपिटर मोटरसायकल क्र. MH12/NL 8479 वरून ३२० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एका अन्य कारवाईत भरारी पथकाने साईबाबा चौक येथे विकास शंकर राठोड (वय ४४वर्षे) याच्या ताब्यातून तीन रबरी ट्यूबमधील १२ हजार ३० व् रुपये किमतीची २४० लिटर हातभट्टी दारु जप्त करून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क अ विभाग , ब विभाग व सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास घोडा तांडा व भोजप्पा तांडा येथील हातभट्टी दारू ठिकाणांवर छापे टाकून ०६ गुन्ह्यात २४० लिटर हातभट्टी दारू व ६, ३५० लिटर गुळ मिश्रित रसायन असा ०१ लाख ५५ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईदरम्यान घोडा तांडा येथील जया भारत राठोड (वय - ३३ वर्षे) या महिलेच्या ताब्यातून पाच प्लास्टिक बॅरल मध्ये साठवून ठेवलेले १, ००० लिटर रसायन व तुळसाबाई मोतीराम राठोड (वय - ५० वर्षे) या महिलेच्या ताब्यातून तीन रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी ८९ लिटर प्रमाणे २४० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. भोजप्पा तांडा येथे टाकलेल्या धाडीत २, ९०० लिटर रसायन नाश करण्यात आले. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल बांगर, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे, उषाकिरण मिसाळ, मानसी वाघ , रोहिणी गुरव, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख , गजानन होळकर, मुकेश चव्हाण, जवान किरण खंदारे, चेतन व्हनगुंटी, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे, योगीराज तोग्गी, आनंदराव दशवंत, प्रशांत इंगोले, वाहनचालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी पार पाडली.