कासेगांवसह पंचक्रोशीत पावसाचा भास अनुभवत बैल पोळा साजरा
कासेगांव/संजय पवार :
'चाहूर चाहूर चांगभलं, पाऊस आला चांगभलं' च्या घोष करीत कासेगांव पंचक्रोशी शेतकरी राजानं शेतात वर्षभर राबलेल्या बैलाप्रती आपला स्नेहभाव जपला. पावसाने पाठ फिरवल्यावर तोंडचं पाणी पळालेल्या बळीराजानं, वरुणराजा बरसल्याचा भास अनुभवत दुष्काळाच्या सावटात बैल पोळा साजरा करताना, नैवेद्य म्हणून 'राजा सर्जा' ला पुरणपोळीचा घास भरला.
परंपरेने, श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षात जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीत पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. 'श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे' या काव्यपंक्ती पुस्तकांच्या पानातच दडल्याने राना-माळांना हिरवळीची चादर पांघरता आली नाही. पावसाने पाठ फिरवल्याने कृषि व्यवस्थेचा आधार असलेल्या पशू-धनाला त्यांचे दात घासता यावे, इतकंही गवत जमिनीवर आलं नाही.
यंदाच्या खरीप हंगामात कासेगांव परिसरात पावसाने जणू ' नाही होय ', म्हणत उशीराने हजेरी लावली होती. तो पडत-पडत आला, पण धरणी मातेची तहान भागली नव्हती. अशातही बळीराजाने काळ्या आईची ओटी भरायची या भावनेने, कोणी यांत्रिक पध्दतीने तर कोणी आपल्या 'राजा-सर्जा' च्या खांद्यावर शिवळ ठेवून पेरणी केली, खरे ! पण काळ्या मातीतून वर आलेले अंकूर बाळसं धरत असतानाच पुन्हा वरूणाने प्रदीर्घ दांडी मारली.
जमिनीच्या वर आलेली कोवळी पिकं दुपार धरून माना टाकू लागली. यंदा परिसरात सोयाबिन पिकाची पेरणी अधिक असून तो फुलोऱ्यात येण्याअगोदर श्रावण मासात 'ग्रीष्म' अनुभवत राहिला. काळ्या जमिनीतील पिकं कशी-बशी तग धरण्याच्या प्रयत्नात होती, मात्र माळावरच्या हलक्या रानात ठिकाणी 'पानगळ' ही अनुभवली. प्रत्येक दिवशी येणारा पांढरा दिवस पाहून बळीराजा अगदी हतबल होऊन आषाळभूत नजरेन आभाळाकडे पाहत होता.
पावसाचं प्रत्येक नक्षत्र कोरडं जात होतं, जगाचा अन्नदाता शेतकरी पावसाळ्यात कडक उन्हं अन् त्याच्या झळा अनुभवत राहिला. खरीप हंगाम धोक्यात आल्यानं, बळीराजा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करून मदतीसाठी टाहो फोडत राहिला. शासनाने अवर्षण स्थिती लक्षात घेऊन पाहणी आणि 'पंच' नामे करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.
अशातच निज श्रावणात श्रीकृष्ण जयंतीपासून आभाळ काळ्या ढगांनी भरू लागलं, चार थेंब पडले अन् पाऊस संपला, अशा पावसाच्या सरी ४-२ दिवसाला आल्या, मातीला थोडासा ओलावा आला पिके आणि गवत थोडं हिरवं दिसू लागलं. यंदाच्या पावसात रस्त्यावरचं पाणी कडेवरच्या चारीत अन् शेतातलं पाणी बांधापर्यंत आलं नाही. शिवारातले पाझर तलाव या घडीला कोरडेच आहेत. ज्यावेळी मान्सून परतीच्या वाटेवर असेल, जाता-जाता मुक्त हस्ताने देऊन गेला तरच जनतेची तृष्णा भागणार आहे, अन्यथा दुष्काळ पाचवीला पूजलाय शिवारातल्या कष्टकरी माणसाबरोबर मुखी जित्राबंही बोलू लागतील.
या संकट कालाचा परिणाम बैल पोळा सणावरही दिसून आला. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बळी राजानं कृषक व्यवस्थेचा आधार असलेले 'राजा-सर्जा' आहेत, त्यांनी पिवडी लाऊन रंगवलं, सारं काही परंपरेप्रमाणं केलं, पण बळीराजाची आर्त हाक 'राजा-सर्जा' च्या पाठीवर कोरल्याचेही दिसलं. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 'राजा-सर्जा' च्या पाठीवर होती. ते माय-बाप सरकारच्या दृष्टीस आलं तर उपकारचं !
शेतकरी वर्गात या सणाला विशेष महत्त्व आहे. गावचे ग्रामदैवत महादेवाला अर्पण नंदी स्वरूप 'कटाळ्या' ला गावकऱ्यांनी श्रमदानातून रंग-रंगोटी करून गावातून सवाद्य मिरवणूक काढली.