विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेटसमोर निदर्शने

shivrajya patra

सोलापूर : राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी गुरुवारी, एक दिवस काम बंद आंदोलन केले. त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आणि सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार यापूर्वी काळ्या फिती लावून निषेध आणि लेखणी बंद असे आंदोलनाचे दोन टप्पे पार पडल्यानंतर गुरुवारी तिसऱ्या टप्प्यात हे एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारले होते.

त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात युनियनचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, जिल्हाध्यक्ष सुनील थोरात, सचिव रविकांत हुक्केरी व उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

यावेळी विद्यापीठ परिसर शिक्षक संघटनेचे डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यापीठ विकास मंचचे डॉ. वीरभद्र दंडे व डॉ. शशिकांत तांबे, एम फुक्टोचे डॉ. नेताजी कोकाटे, सुटाचे डॉ. वशिष्ठ गुरमे यांनी आंदोलनस्थळी येऊन पाठींबा जाहीर केला.

सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सचिव राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर व खजिनदार राहूल कराडे यांच्या तर अशासकीय महाविद्यालय संघटनेचे भीमा मस्के व शरद मस्के यांच्या नेतृत्वाखाली शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपापल्या गेटसमोर प्रलंबित मागण्याच्या घोषणा देऊन मागण्या मान्य होण्यासाठी निदर्शने केली. सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला.

..... या आहेत प्रमुख मागण्या !
= शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत.
= शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी
= सेवानिवृत्तीचे वय समान 60 वर्षे करावे.
= पदोन्नतीची संधी उपलब्ध नसलेल्या कर्मचाऱ्यांना 10-20-30 ही
सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
= नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
= शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा.

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या : संचालक
या काम बंद आंदोलनामुळे परीक्षेत अडथळा येण्याची शक्यता होती, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा गुरुवारी, 26 नोव्हेंबर रोजी तीन सत्रात (स.9 ते 11, दु. 12 ते 2 आणि दु. 3 ते 6)  सुरळीत पार पडल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगतले.

.... फोटो ओळी



या छायाचित्रात दयानंद महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी गेटसमोर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.



छायाचित्रात सोलापूर विद्यापीठाच्या गेटसमोर निदर्शने केल्यानंतर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांना युनियनचे अध्यक्ष सुनील थोरात यांनी निवेदन दिले.
-----

To Top