जन्म-मृत्यू नोंदणीसंबंधी रुग्णालयाकडील 'अर्धवट माहिती' चा नागरिकांना मनस्ताप : प्रमोदकुमार छाजेड

shivrajya patra

धामोरी/प्रतिनिधी : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीतील जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाने जन्मनोंदणीसाठी आवश्यक असलेली माहिती अचूक आणि पूर्ण स्वरूपात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठविणे अपेक्षित असताना, माहितीतील त्रुटींमुळे नागरिकांना जन्मदाखला मिळविण्यासाठी तसेच त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी वारंवार महानगरपालिकेच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. या प्रकाराकडे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रमोदकुमार छाजेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.


बाळाचा जन्म रुग्णालयात झाल्यानंतर जन्मनोंदणीची प्राथमिक जबाबदारी संबंधित रुग्णालय प्रशासनाची असते. मात्र, जन्मनोंदणी करताना आई-वडिलांची नावे, जन्मतारीख, जन्मस्थळ, पत्ता, आवश्यक ओळख तपशील आदी माहिती अचूक भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः आई आणि वडिलांच्या आधारकार्डवरील नावांची अचूक नोंद, संपूर्ण पत्ता आणि पिनकोडसह माहिती घेतल्यास भविष्यात जन्मदाखल्यामध्ये चुका होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. रुग्णालयाने माहिती पाठविण्यापूर्वी ती पालकांकडून तपासून घेण्याची व्यवस्था करावी, असंही छाजेड यांनी यावेळी म्हटले.


रुग्णालयाकडून पाठविण्यात आलेल्या माहितीमध्ये नावाचे स्पेलिंग चुकीचे असणे, आई-वडिलांच्या नावात तफावत असणे, पत्त्याची अपूर्ण नोंद, गाव किंवा शहराच्या नावातील चुका, पिनकोडचा अभाव अशा त्रुटी राहिल्यास त्याचा त्रास संबंधित कुटुंबाला सहन करावा लागतो. 


जन्म दाखला तयार झाल्यानंतर त्यामध्ये चूक आढळल्यास दुरुस्तीची प्रक्रिया करावी लागते. यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, अर्ज करणे आणि संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. अनेकदा नोकरी-व्यवसाय सोडून नागरिकांना या कामासाठी वेळ द्यावा लागतो. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.


जन्मनोंदणीप्रमाणेच मृत्यू नोंदणीच्या बाबतीतही रुग्णालयांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. मृत व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, मृत्यूची तारीख आणि इतर आवश्यक तपशील योग्य पद्धतीने नोंदविणे आवश्यक आहे. मृत्यू दाखल्यामध्ये चुकीची माहिती असल्यास वारस नोंद, विमा, बँक व्यवहार, मालमत्तेसंबंधी कामे तसेच विविध शासकीय प्रक्रियांमध्ये नागरिकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जन्म आणि मृत्यू या दोन्ही नोंदणी प्रक्रियांमध्ये अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.


अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना जन्म-मृत्यू नोंदणीबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात. प्रत्येक रुग्णालयाकडून महानगरपालिकेकडे पाठविण्यात येणाऱ्या माहितीची वेळोवेळी तपासणी करावी. कोणत्या रुग्णालयाकडून वारंवार चुकीची किंवा अपूर्ण माहिती पाठविली जात आहे, याचा रुग्णालयनिहाय आढावा घ्यावा. वारंवार चुका करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा देऊन नियमानुसार कारवाई करावी. तसेच जन्म-मृत्यू नोंदणीसाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.


जन्म आणि मृत्यू या दोन्ही घटना प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाच्या असतात. अशा वेळी कागदपत्रांमधील त्रुटींमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणे ही बाब योग्य नाही. रुग्णालयांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास महानगरपालिका प्रशासनावरील अनावश्यक ताण कमी होईल आणि नागरिकांनाही वेळेत अचूक दाखले मिळू शकतील.


महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रश्नाकडे केवळ कागदोपत्री बाब म्हणून न पाहता नागरिकांच्या संभाव्य अडचणींचा विचार करून ठोस उपाययोजना कराव्यात. रुग्णालयांकडून जन्म-मृत्यूची माहिती पाठविताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, माहितीची अचूक नोंद आणि रुग्णालयनिहाय जबाबदारी निश्चित करावी. नागरिकांना चुकीच्या माहितीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोदकुमार छाजेड यांनी केली आहे.

*****

To Top