नगरसेवक मधुसूदन जंगम यांचं निधन; राजकीय, सामाजिक वर्तुळात शोककळा

shivrajya patra

स्वातंत्र्यपूर्व काळापासून जंगम परिवाराला सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा


सोलापूर/प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तसेच जांबमुनी मोची समाजातील सामाजिक कार्याशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व मधुसूदन जंगम यांचे गुरुवारी मध्यरात्री अल्पशः आजाराने निधन झाले. स्थानिक एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 52 वर्षीय होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच स्थानिक राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरलीय. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. 


मधुसूदन जंगम हे जुळे सोलापूर येथील कुमठेकर हॉस्पिटल परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम यांचे ते आजे सासरे होत. त्यांच्या निधनाने जंगम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक कार्याचा वारसा

लष्कर परिसरातील जंगम परिवाराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक कार्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. गेल्या 70 ते 80 वर्षांपासून या परिवाराने सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. समाजातील विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत या परिवाराने परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


जंगम परिवारातून अनेक कुस्तीपटू आणि कबड्डीपटू घडले आहेत. त्यामुळे या परिवाराचे नाव केवळ सामाजिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही आदराने घेतले जाते. सामाजिक बांधिलकी आणि क्रीडा परंपरेचा वारसा जपणाऱ्या याच परिवारातील मधुसूदन जंगम यांच्या निधनाने परिसरातील नागरिकांमध्ये दुःख व्यक्त होत आहे.


राजकीय वर्तुळातून हळहळ

सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 चे भाजप नगरसेवक म्हणून मधुसूदन जंगम यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे भाजपच्या स्थानिक राजकीय वर्तुळातही दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका लोकप्रतिनिधीच्या निधनाने परिसरातील नागरिकांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे.


वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी त्यांची जीवनयात्रा संपल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने जंगम परिवाराच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील परंपरेतील एक महत्त्वाचा दुवा हरपल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.


सायंकाळी अंत्यसंस्कार

मधुसूदन जंगम यांची अंत्ययात्रा शुक्रवारी, सायंकाळी 04 वाजता जुळे सोलापूर येथील कुमठेकर हॉस्पिटलशेजारील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यानंतर मोदी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती हरीष जंगम यांनी दिली. 


मधुसूदन जंगम यांच्या निधनाने जंगम परिवारासह सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.


त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ आणि मोठा नातलग परिवार असा परिवार आहे. 

To Top