वाचन प्रेरणा दिनानिमित्त सोशल महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
सोलापूर : विद्यार्थ्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन वाचनाची सवय जोपासावी, ज्ञानाच्या बळावर स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे आणि जीवनात उच्च ध्येय निश्चित करून त्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन प्राचार्य प्रा. डॉ. आय. जे. तांबोळी यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील वैचारिक क्षमता विकसित व्हावी आणि वाचनाच्या माध्यमातून सक्षम व्यक्तिमत्त्व घडावे, या उद्देशाने एस. एस. ए. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेला 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आय. जे. तांबोळी होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक नारायणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय साधला. वाङ्मय मंडळाच्या प्रा. रहीसा मिर्झा यांनी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांना वक्तृत्वाच्या माध्यमातून स्वतःचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी प्राचार्य इ. जा. तांबोळी बोलत होते.
डॉ. कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. ज्ञान मिळविण्याची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि साधी राहणी या गुणांच्या बळावर त्यांनी देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली. राष्ट्रपतीपदावर विराजमान असतानाही त्यांनी साधेपणा जपला, असंही प्राचार्य डॉ. तांबोळी यांनी सांगितले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पुस्तक वाचनाचे महत्त्व’, ‘सोशल मीडियाच्या जगात वाचन संस्कृतीचे आव्हान’, ‘वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास’ आणि ‘पुस्तकांशी मैत्री : यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली’ असे समकालीन आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित विषय देण्यात आले होते.
मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी देण्यात आली. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि बदलती जीवनशैली यांच्या पार्श्वभूमीवर पुस्तक वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून अधोरेखित केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून उर्दू विभागाचे उपविभाग प्रमुख प्रा. मेजर डॉ. गौस अहमद शेख आणि भूगोल विभागप्रमुख डॉ. सचिन राजगुरू यांनी काम पाहिले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. गौस अहमद शेख म्हणाले, “पुस्तकांशी मैत्री केली, तर जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो. केवळ पुस्तकांकडे पाहून किंवा ती वाचल्याचा दिखावा करून चालणार नाही, तर पुस्तकांच्या अंतरंगात जाऊन त्यातील विचार, ज्ञान आणि अनुभव समजून घेणे आवश्यक आहे.
पुस्तकांचे वाचन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता जीवन समृद्ध करण्यासाठी केले पाहिजे.” त्यांच्या या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचनाचे खरे महत्त्व समजून घेण्याची प्रेरणा मिळाली.
या वक्तृत्व स्पर्धेत अल्फिया मोमीन हिने प्रथम क्रमांक, जिया अल रहमान खाटीक यांनी द्वितीय क्रमांक, तर रियान चौधरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची, विषयाचा सखोल अभ्यास करण्याची आणि आत्मविश्वासाने विचारपीठावर बोलण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक नारायणकर यांनी केले, तर प्रा. रहीसा मिर्झा यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी फारुख शेख, प्रा. सादिक शिपाई, प्रा. आफताब मुल्ला, प्रा. तबस्सून मोमीन यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

