कामगार चळवळीतील योगदानाबद्दल माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा सन्मान !
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. राज्य व केंद्र शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच आपण कामगारांसोबत नक्कीच उभा राहीन, असा विश्वास सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी व्यक्त केला.
आडम मास्तर यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा घरकुल प्रकल्प उभारुन 30 हजार कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून दिल्याबद्दल कौतुक केले. हिंद मजदूर पंचायतचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त झोले बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कम्युनिस्ट अॅड. रा. गो. म्हेत्रस, मौलाना आझाद महामंडळाचे माजी जिल्हा व्यवस्थापक सी. ए. बिराजदार, सरकारी कामगार अधिकारी जयदीप मगर, नदाफ पतसंस्थेचे चेअरमन सलीम नदाफ, अर्जुन सलगर, पत्रकार सलाऊद्दीन शेख, माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, माकपचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड युसूफ मेजर आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहे. सर्वच कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असंही सहाय्यक कामगार आयुक्त झोले यांनी आश्वासित केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आडम मास्तर यांनी सांगितले की, या सत्कारामुळे माझी जबाबदारी पुन्हा वाढली आहे. नव्या जोमाने पुढील काळात कार्य करण्याची उमेद निर्माण झाली आहे. माझा हा सन्मान म्हणजे शहर आणि राज्यातील सर्व क्षेत्रातील कामगारांचा मी गौरव समजतो, असं आडम मास्तर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत साथी बशीर अहमद यांनी केले. यावेळी सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा हिंद मजदूर पंचायतच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ. एजाज शेख, चंद्रशेखर बदलापुरे, श्रीमती फरीदा गोट्यालकर, छगन पंढरे, दौला शेख, शरणू गुडीयवरु, कॉ. निहाल शेख, श्रीमती लक्ष्मी देवकर, श्रीमती यास्मीन अन्सारी, इम्रान मंगलगिरी, जहीर शेख, मुश्ताक शेख, बाबा बागवान, अशपाक शेख आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिध्दार्थ बोराडे तर शंकर तुम्मा यांनी आभार मानले. यावेळी महिला-पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
...चौकट
शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची गरज : माजी आमदार नरसय्या आडम
मागील 30 वर्षापासून असंघटीत व विडी कामगारांसाठी आंदोलन करुन त्यांना न्याय देण्यासाठी आजही झगडत आहे. राज्य शासनाने विडी कामगारांना किमान वेतन म्हणून प्रतिदिन 379 रुपये जाहिर करुन तसा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठीही आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची गरज आहे.


