पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पार पडले मतदान कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण

shivrajya patra

सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 साठी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 08 ते दुपारी 04 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 27 ऑक्टोबर रोजी पुणे येथे मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, इतर कर्मचारी, मायक्रो ऑब्झर्व्हर तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण आज रंगभवन येथे पार पडले.


जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात सकाळच्या सत्रात पदवीधर मतदारसंघासाठी, तर दुपारच्या सत्रात शिक्षक मतदारसंघासाठी प्रशिक्षण देण्यात आले. पदवीधर मतदारसंघाच्या 117 तर शिक्षक मतदारसंघाच्या 76 मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.



पदवीधर मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, तर शिक्षक मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. 



सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचना काळजीपूर्वक समजून घेऊन मतदान केंद्रावर त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण, त्रुटी किंवा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.



मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला. 



यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, निवडणूक तहसीलदार एस. विभुते, नायब तहसीलदार शेख आदी उपस्थित होते.

***


To Top