तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी कासेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत औषधोपचार केंद्र

shivrajya patra




कासेगांव : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या हजारो भाविकांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत कासेगावच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सोलापूर-तुळजापूर महामार्गावर मोफत प्राथमिक औषधोपचार केंद्र सुरू करण्यात आले होते, भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.


या औषधोपचार केंद्राचे उद्घाटन कासेगांवचे उपसरपंच शहाजान शेख यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला होता.



या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर रोकडे, संभाजी चौगुले, प्रकाश औदुंबर हेडे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कासेगांवच्या समुदाय आरोग्य अधिकारी सायली चांदेकर, आरोग्य सेविका रवळे, आरोग्य सेवक पडळकर, प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी येथील आरोग्य सेवक, आशा सेविका, अभिमान हेडे, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी अनेक भाविक लांबचा पायी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान थकवा, पाय दुखणे, अशक्तपणा तसेच अन्य किरकोळ आरोग्यविषयक त्रास उद्भवण्याची शक्यता असते. अशा वेळी भाविकांना महामार्गावरच प्राथमिक औषधोपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायत कासेगावच्या वतीने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र 2 दिवस-रात्र भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत होते.


सरपंच यशपाल वाडकर व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. 



भाविकांना प्रवासादरम्यान आवश्यक प्राथमिक औषधोपचार मिळावेत आणि त्यांचा पुढील प्रवास सुखकर आणि अधिक सुलभ व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. धार्मिक यात्रेच्या काळात भाविकांना मदतीचा हात देणारा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.


भाविकांच्या सेवेला प्राधान्य देत कासेगांव ग्रामपंचायतीनं सुरू केलेल्या या मोफत औषधोपचार केंद्रामुळे पायी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणारा होता, ग्रामपंचायतीच्या या सेवाभावी उपक्रमाचे परिसरातून स्वागत करण्यात आलं.

To Top