कायदेशीर दत्तक प्रक्रियेतून बालकाला मिळाले हक्काचे घर

shivrajya patra


जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते बालक हस्तांतरण आणि प्रमाणपत्र वितरण


सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दत्तक विधानाची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेद्वारे एका बालकाला हक्काचे घर मिळाले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते बालक हस्तांतरण व प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया पार पडली. 


अनाथ, निराधार तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि हक्काचे कुटुंब मिळावं, या उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने दत्तक विधान प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बालकांना कायदेशीर प्रक्रियेद्वारेच दत्तक घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.


दत्तक विधान प्रक्रियेत बालकाचे सर्वोत्तम हित, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य यांना प्राधान्य देण्यात येते.



यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी इच्छुक दत्तक पालकांनी शासनाच्या अधिकृत CARA (Central Adoption Resource Authority) यंत्रणेच्या माध्यमातून नोंदणी करून विहित कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे, असं आवाहन केले. 


दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पात्र दाम्पत्यांनी तसेच नियमानुसार पात्र अविवाहित व्यक्तींनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, गृहअभ्यास अहवालाची प्रक्रिया पूर्ण करणे, बालकाचे नियमानुसार संदर्भीकरण करून कायदेशीर दत्तक आदेशाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.


बालकांना सुरक्षित वातावरण, प्रेम आणि कुटुंबाचा आधार मिळावा, यासाठी दत्तक विधानाची प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अनधिकृत मार्गाने बालक दत्तक घेणे टाळून शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन यावेळी करण्यात आले.


यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर, जिल्हा परिविक्षा अधिकारी वैशाली भोसले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन थोरात, चाईल्ड लाईन समन्वयक आनंद ढेपे, समुपदेशक मल्लिनाथ तमशेट्टी, सुपरवायझर विश्वेश्वर वाघमारे, अनोज कदम, नवरंगे बालकाश्रमच्या अधीक्षक राजश्री गाडे तसेच दत्तक पालक उपस्थित होते.

*****

(शब्दभार : डीआयओ & सुहेल शेख, सोलापूर.)

To Top