भाविकांच्या सुरक्षेसाठी महामार्गावर वाहनांना बंदी; पर्यायी वाहतूक मार्गाचा आदेश जारी

shivrajya patra




सोलापूर : 25 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमा आणि 26 ऑक्टोबर रोजी मंदिर पोर्णिमानिमित्त श्री. तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूरकडे पायी चालत जात असतात. सदर मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय व अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यास प्रतिबंध करण्याकरिता खालील मार्गावर वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी बुधवारी, एका जाहीरनाम्याद्वारे दिली.


शुक्रवारी,23 ऑक्टोबरच्या 00.01 ते दिनांक 26 ऑक्टोबर रोजीचे 24.00 वा. पर्यंत खालील नमूद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास-जाण्यास बंदी घालण्यात येत आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील सोलापूर शहरातील जूना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहर हा मार्ग वाहतुकीस बंद करणे आवश्यक असल्याचे या आदेशात म्हटलं आहे. त्यास पोलीस खात्याची वाहने, अत्यावश्यक सेवेची व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतीलल अशी वाहने अपवाद असतील, असंही पोलीस आयुक्तांनी त्या आदेशात उल्लेखिलं आहे.


महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 33 चे पोटकलम (1) व (ब) अन्वये पोलीस आयुक्तांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन हा आदेश जारी करण्यात आल्याचे या आदेशात नमूद आहे.

वाहतुकीस पर्यायी मार्ग


(1) पुणे महामार्गाकडून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी वाहने सोलापूर (बाळे गांव) बार्शी-येरमाळा मार्गेछत्रपती संभाजी नगर करिता पथक्रमण करतील.


(2) पुणे महामार्गाकडून धाराशिवकडे जाणारी वाहने सोलापूर (बाळे गांव) बार्शी-वैराग मार्गे धाराशिव करिता पथक्रमण करतील.


(3) पुणे महामार्गाकडून लातूरकडे जाणारी वाहने सोलापूर (बाळे गांव) बार्शी- येडशी-ढोकी-मुरूड मार्गे लातूर करिता पथक्रमण करतील.


(4) सोलापूर/पुणे महामार्गाकडून तुळजापूर कडे जाणारी वाहने- हैद्राबाद महामार्गावरील सोलापूर (मार्केट यार्ड)-बोरामणी गांव-इटकळ-मंगरूळ पाटी-मार्गे लातूर करिता पथक्रमण करतील.


या जाहिरनाम्यान्वये काढण्यात आलेला आदेश हा 23 ऑक्टोबर रोजीचे पहाटे 00.01 वा. पासून ते 26 ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचा भंग करणारा व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या शिक्षेस पात्र होईल, असंही या जाहीरनाम्याद्वारे आदेशित केलं आहे.


To Top