इक्बाल मैदान परिसरात उद्यान, ओपन जिम, स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक व क्रीडांगण विकसित करा !

shivrajya patra


शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सलाहोद्दीन शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


सोलापूर : सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या इक्बाल मैदान परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी उद्यान, ओपन जिम, स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायामाची सुविधा तसेच लहान मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सलाहोद्दीन बाशा शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन शुक्रवारी,16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.


सोलापूर शहरातील शनिवार पेठ, साखर पेठ, मुस्लिम बादशाह पेठ, तेलंगी मुस्लिम पेठ तसेच आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. या भागात मुस्लिम अल्पसंख्याक समाजासह विविध समाजातील नागरिक वास्तव्यास असून, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत व्यायाम, खेळ आणि मनोरंजनासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधांची कमतरता जाणवत आहे. 


त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली जोपासण्यासाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


इक्बाल मैदान परिसरात उद्यान विकसित करून नागरिकांसाठी फिरण्याची सुविधा, ओपन जिम, स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक आणि महिला व पुरुषांसाठी व्यायामाच्या सुविधा निर्माण कराव्यात. तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, युवकांसाठी क्रीडांगण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार

सध्याच्या धावपळीच्या जीवनात नियमित व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व वाढले आहे. मात्र, परिसरात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना व्यायामासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागते. इक्बाल मैदान परिसरात या सुविधा उपलब्ध झाल्यास महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा फायदा होईल. युवकांना विविध खेळांचा सराव करता येईल, तर मुलांना मैदानी खेळांसाठी सुरक्षित जागा मिळेल. यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच सामाजिक आणि क्रीडा विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.


सार्वजनिक जागेचे संरक्षण करण्याची मागणी

इक्बाल मैदान परिसराला सार्वजनिक दृष्टीने मोठे महत्त्व आहे. या जागेवर अतिक्रमण होऊ नये किंवा तिचा खासगी वापर होऊ नये, यासाठी संबंधित जागेची मालकी, आरक्षण आणि उपलब्ध शासकीय नोंदी तपासून तिचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊन या जागेचा उपयोग नागरिकांसाठी उद्यान, व्यायाम आणि क्रीडा सुविधांच्या निर्मितीसाठी करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी आणि महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी

या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित शासकीय विभाग आणि सोलापूर महानगरपालिकेला आवश्यक निर्देश द्यावेत. जागेची पाहणी करून उपलब्धतेनुसार विकास आराखडा तयार करावा आणि आवश्यक प्रशासकीय मंजुरी व निधीची तरतूद करून कामाला गती द्यावी, अशी विनंती सलाहोद्दीन बाशा शेख यांनी केली आहे.


इक्बाल मैदान परिसरात आधुनिक सार्वजनिक सुविधा निर्माण झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा, युवकांच्या क्रीडा विकासाचा आणि सार्वजनिक जागेच्या संरक्षणाचा विचार करून प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असंही यावेळी सांगण्यात आलं.


यावेळी वाहतूक संयुक्त महासंघ महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद अशपाक शेख शब्बीर शेख हयात कोटी युसूफ पठाण असलम शेख रशीद पठाण मुस्ताक शेख अन्सार शेख एजाज बिजापुरे समीर शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते 

****

To Top