सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट असल्याने शिवसेनेने एक मोठा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा 'शिवसेना दांडिया गरबा 2026' हा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. या गरब्याचा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रकाश राठोड यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, या गरब्याचा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची प्रकाश राठोड यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रकाश राठोड म्हणाले, "यावर्षी सोलापूर जिल्ह्यात खूप मोठा दुष्काळ पडला आहे. मी स्वतः शेतकरी असल्याने या दुष्काळाची मोठी झळ माझ्या शेतकरी बांधवांना, त्यांच्या जनावरांना आणि पिकांना बसणार आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मनाला वेदना होत आहेत."
केवळ निधी देऊन न थांबता, लवकरच सोलापूर येथे 'शिवसेना शेतकरी मदत कक्ष - सेवा केंद्र' सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाद्वारे- गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, पीकविमा व शासकीय अनुदानाची पाहणी, मदत वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
"हा आपल्या बळीराजाचे अश्रू पुसण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. दुष्काळाशी आपण मिळून दोन हात करूया. पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस चांगला होईल, शेतं हिरवीगार होतील, तेव्हा आपण दुप्पट उत्साहात गरबा खेळूया," असंही राठोड यांनी म्हटलं आहे.

