चारा छावण्यांऐवजी थेट अनुदान द्या ! पहेलवान माऊली हेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

shivrajya patra

सोलापूर : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्याऐवजी शेतकरी आणि पशुपालकांच्या बँक खात्यावर थेट चारा अनुदान जमा करावं, अशी मागणी मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली नागनाथ हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत अत्यल्प पाऊस झाल्याने शेती आणि पशुधनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पिके करपण्यास सुरुवात झाली असून आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, असं पहेलवान माऊली हेगडे यांनी निवेदनात म्हटलं आहे.


यापूर्वीच्या दुष्काळात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये जागेची कमतरता, जनावरे बांधण्याच्या जागेवरून वाद, कमी प्रमाणात चारा वाटप, बनावट नोंदी तसेच आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वारं-वार समोर आल्याचे त्यांनी नमूद केले.


त्यामुळे चारा छावणी किंवा चारा डेपो पद्धतीपेक्षा पशू गणनेचा आणि एकुण पशुधनाच्या संख्येनुसार थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अधिक प्रभावी आणि पारदर्शक ठरेल, असं हेगडे यांनी म्हटलं आहे.


शेतकरी व पशुपालकांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केल्यास त्यांना त्यांच्या गरजेनुसार ओला व सुका चारा, कडबा, भुसा, पेंड वैरण तसेच इतर पशुखाद्य खरेदी करता येईल. तसेच शासनाचा व्यवस्थापनावरील खर्च कमी होऊन पारदर्शकता वाढेल. त्यामुळे ही योजना तातडीने राबवावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी केली आहे.

शिवभार : विजय बाबर, सोलापूर.

To Top