महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेच्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत सूचना
सोलापूर : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण खाजगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी लेखी स्वरूपात शासनास कळवाव्यात. तसेच वय वंदन कार्डसाठी शहरी तसंच ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांच्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी आशा वर्कर व विस्तार अधिकाऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत सर्व तहसीलदारांना पत्राद्वारे कळविण्याचे आणि रुग्णांचे रेशन कार्ड ऑनलाईन करून घेण्याचे निर्देश दिले. जनतेला प्रत्यक्ष लाभ झाला तरच ही योजना यशस्वी होईल, त्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असंही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गुंजाळ यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य हनुमंत कुंभार यांनी ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी व माहितीअभावी वय वंदन कार्डपासून वंचित राहण्याबाबतच्या समस्या मांडल्या.
या बैठकीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य हनुमंत कुंभार, जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गुंजाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ तसेच शहरातील अंगीकृत खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी व ग्रामीण भागातील रुग्णालयांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
*****

