डीजीक्लास स्मार्ट टीव्हीचा अभ्यासात योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी नवीन ज्ञान आत्मसात करावं : प्रा. बसवराज बिराजदार

shivrajya patra

रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे न्यू इंग्लिश स्कूल कुसूरला स्मार्ट टीव्ही, विद्यार्थीनींना सायकली भेट

सोलापूर :  शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च व चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचले पाहिजे. शाळेसाठी दिलेल्या डीजीक्लास स्मार्ट टीव्हीचा अभ्यासात योग्य वापर करून नवीन ज्ञान आत्मसात करावं, असं आवाहन रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष प्रा. बसवराज बिराजदार यांनी मार्गदर्शनपर भाषणात केले.


रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे रोटरी क्लबच्या सीएसआर फंडातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षण मिळावं, विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करावी आणि त्यांचे करिअर चांगले व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब दरवर्षी ग्रामीण भागातील शाळांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्मार्ट टीव्ही संच भेट म्हणून देतात. या उपक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील न्यू इंग्लिश स्कूलची निवड करण्यात आली होती.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे न्यू इंग्लिश स्कूलला स्मार्ट टीव्ही आणि ग्रामीण भागातील लांब शेतातून, वाड्या वस्तीवरून पायी चालत येणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत येण्या-जाण्याचे सोयीचे व्हावं म्हणून विद्यार्थिनींना सायकलीचेही वाटप करण्यात आले.


प्रथम डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.  यावेळी शाळेतील दहावी व इतर परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष प्रा. बिराजदार बोलत होते.

यावेळी विचारपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष प्रा. बसवराज बिराजदार, सचिव संतोषकुमार सावळगी, खजिनदार महेश साळुंके, प्लीक इमेज डायेक्टर इक्बाल बागवान, व्यावसायिक सेवा डायेक्टर योगिनाथ कुडते, मेंबर निहाल तांबोळी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला भोरे, माजी मुख्याध्यापक संजय जोशी, डॉ. शिवकुमार नांगरे,भीमाशंकर हत्ताळी, मुख्या. बाळासाहेब पारगोंडे, अशोक बिराजदार, सौ. लक्ष्मी नरोटे, रविंद्र माशाळे, सिध्दाराम विंचूरे आदी उपस्थित होते. स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुनीलकुमार नांगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


दिलेल्या दोन ड्रममध्ये सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळे जमा करून आपण आपल्या शेतासाठी स्वत: सेंद्रिय खत निर्मित करून त्याचा वापर आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात करावा, असंही अध्यक्ष प्रा. बिराजदार यांनी यावेळी सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला भोरे यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आणि अध्यक्षांना स्मृति चिन्ह भेट दिले.


यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे स्थानिक चेअरमन सुनीलकुमार नांगरे, मुख्याध्यापक बाळासाहेब पारगोंडे, माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक सचिन पाटील यांनी केले तर रोटरी क्लबचे महेश साळुंके यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व सेवकांनी खूप परिश्रम घेतले.

To Top