"नो डीजे - नो डॉल्बी" ही संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या मंडळाच्या गणरायांची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती आणि वृक्षारोपण
सोलापूूर : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांनी यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान "नो डीजे - नो डॉल्बी" ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेला ज्या गणेशोत्सव मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तिथं पोलिस अधीक्षकांनी स्वतः हजर राहून गणपतीची आरती व वृक्षारोपण केलं.
गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने शांततामय आणि श्रध्दापूर्ण वातावरणात साजरा करण्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हा ग्रामीण हद्दीत ' नो डीजे- नो डॉल्बी ' उपक्रम राबविण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलं होतं. तसेच जी गणेशोत्सव मंडळे 1000 ते 2000 वृक्ष लागवड करणार आहेत, अशा गणेश मंडळाच्या आरतीसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितलं होतं.
या आवाहनाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळत असून माळशिरस, पंढरपूर शहर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप आणि माढा येथील मंडळातर्फे हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबविण्यात आलेला आहे.
पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी स्वतः हजर राहून गणपतीची आरती व वृक्षारोपण केले आहे. यावेळी त्यांनी पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी वृक्ष लागवड गरज लक्षात घेऊन देशी वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याचा लाभ भावी पिढ्यांना मिळणार असल्याचेही सांगितले.
