जयंती 2 : समता आणि माणुसकीचा शोध !

shivrajya patra


‘जयंती 2’ हा चित्रपट पाहून बाहेर पडताना केवळ कथानक आठवत नाही; काही प्रश्न मनात ठाण मांडून बसतात. शिक्षणसंस्था माणूस घडवतात की जात? ‘मेरिट’ खरंच संधींपासून स्वतंत्र असते का? आरक्षणामुळे समाज विभागला जातो की आधीपासून असलेल्या सामाजिक विषमतेला तोडण्यासाठी आरक्षणाची गरज निर्माण झाली ?


या चित्रपटातील पायल मरकाम ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा ! अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणारी ही विद्यार्थिनी. पूर्व विदर्भातील चंद्रपूर मधून  पूणे येथे शिक्षणासाठी येते; पण तिच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा तिची जात आणि आरक्षण अधिक महत्त्वाचे ठरवले जाते. 


तिची गुणवत्ता पाहण्याआधी तिच्या सामाजिक ओळखीचा चष्मा लावला जातो. हीच तर आपल्या शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका नाही का? पायलचे “जंगलात माणुसकी मिळते” हे वाक्य केवळ संवाद नाही; तो तथाकथित आधुनिक आणि सुशिक्षित समाजाच्या तोंडावर मारलेला प्रश्न आहे. 


जंगलाला आपण मागासलेले म्हणतो; मग माणुसकी हरवलेल्या शहराला प्रगत कसे म्हणायचे? पायलचा संघर्ष आरक्षणासाठी नाही, तर माणूस म्हणून सन्मान मिळवण्यासाठी आहे. अन्याय सहन न करता प्रश्न विचारण्याची तिची भूमिका व्यवस्थेला अस्वस्थ करते. कारण अन्याय करणाऱ्याला प्रश्न विचारणारा विद्यार्थी कोणत्याही व्यवस्थेसाठी अधिक कठीण असतो. जंगलात माणुसकी मिळते’ म्हणणारी पायल व्यवस्थेच्या चेहऱ्यावरचा आरसा ठरते!


आरक्षणाने जात निर्माण केली की जातीने आरक्षण ? : आरक्षणावर चर्चा करताना इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चा करतांना मनोहर पंत म्हणतो, “आरक्षणामुळे जातीयवाद वाढलेला आहे .”  प्रचारकी दृष्टीने असे म्हणणे सोपे आहे; पण प्रश्न असा आहे— जातीय विषमता आधी नव्हती का?  शतकानुशतके शिक्षण, ज्ञान, सत्ता आणि संधींपासून वंचित ठेवलेल्या समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे आरक्षण हे जातीचे कारण नसून सामाजिक विषमतेला दिलेले संविधानिक उत्तर आहे.


आरक्षणाला ‘मेरिटविरोधी’ ठरविण्यापूर्वी एक मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे. मेरिट निर्माण होण्यासाठी सर्वांना समान संधी मिळाल्या होत्या का? समान मैदानावर धावण्याची संधीच जर समान नसेल, तर शेवटी मिळालेल्या गुणांनाच संपूर्ण मेरिटचे प्रमाण मानणे कितपत न्याय्य?


ओबीसी चे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संतोष मध्ये झालेला बदल : संतोषच्या विचारांमधील बदल हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. सुरुवातीला आरक्षणाकडे संशयाने पाहणारा संतोष जेव्हा पायलचा प्रत्यक्ष संघर्ष अनुभवतो, तनुजा या पात्रासोबत त्याची चर्चा, तेव्हा त्याच्या विचारांना धक्का बसतो. आणि काही उदाहरणे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तो आरक्षणाचे महत्व इतरांना पटवून देतो.


विचार बदलण्यासाठी उपदेशापेक्षा वास्तवाची ओळख अधिक प्रभावी असते. आरक्षणाचा लाभ घेणारा प्रत्येक विद्यार्थी ‘कमकुवत’ असतो, हा पूर्वग्रह तिथेच मोडतो. आरक्षण विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेपासून मुक्त करत नाही; उलट संधीच्या दारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध करून देते.


तनुजा : प्रश्न विचारणाऱ्या पिढीचा आवाज : महाविद्यालयातील चर्चेत मनोहर पंत प्रचारकी थाटात  दिशाभूल करणारे, "संविधानाने आरक्षण फक्त दहा वर्षाकरिताच दिले होते," असे जेव्हा तो म्हणतो. त्यास तनुजा आरक्षणाच्या संदर्भाने संविधानात असलेल्या कलमांचा उल्लेख करत अभ्यासूपणे उत्तर देते. 


तनुजा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. तिच्या भूमिकेतून चित्रपट सांगतो की, शिक्षण म्हणजे फक्त पदवी मिळवणे नव्हे; अन्याय ओळखणे, प्रश्न विचारणे आणि संविधानिक मूल्यांसाठी उभे राहणे हेही शिक्षणाचेच उद्दिष्ट आहे. 



आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आर्थिक गरिबी आणि सामाजिक वंचितता हे एकच वास्तव नाही. त्यामुळे आरक्षणाची चर्चा करताना सामाजिक प्रतिनिधित्व, ऐतिहासिक अन्याय आणि संधींची विषमता या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 


मनोहर पंत : राजकारणाला माणसांपेक्षा मतभेद प्रिय असतात तेव्हा... : मनोहर पंत हे पात्र चित्रपटाला आणखी एक गंभीर राजकीय परिमाण देतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर समाजातील जातीय आणि धार्मिक दरी वाढवण्यासाठी केला जातो. कार्यकर्त्यांना विचार देण्याऐवजी भावनिक ध्रुवीकरणासाठी वापरले जाते. 


ही प्रवृत्ती एका पात्रापुरती मर्यादित नाही. जेव्हा राजकारणाला समाजाच्या प्रश्नांपेक्षा समाजातील भांडणे अधिक उपयुक्त वाटू लागतात, तेव्हा जात आणि धर्म हे माणसांना जोडण्याचे नव्हे, तर तोडण्याचे हत्यार बनतात. 

म्हणून ‘जयंती 2’ चा संघर्ष केवळ विद्यार्थ्यांचा नाही; तो शिक्षण विरुद्ध पूर्वग्रह, संविधान विरुद्ध जातीय मानसिकता आणि माणुसकी विरुद्ध द्वेषाच्या राजकारणाचा संघर्ष आहे.

आता प्रश्न आपल्यासमोर आहे....! आरक्षणावर वाद घालण्यापेक्षा आपण आरक्षणाची गरज निर्माण करणारी सामाजिक विषमता संपवण्याबद्दल बोलणार आहोत का? ‘मेरिट’ची भाषा बोलताना संधींची विषमता स्वीकारणार आहोत का? शिक्षण घेऊनही जात पाहणार आहोत की शिक्षणामुळे जातीय भिंती पाडणार आहोत ? आणि राजकीय स्वार्थासाठी तरुणांच्या मनात द्वेष पेरणार आहोत की संविधानाच्या मूल्यांची बीजे रुजवणार आहोत?


 'जयंती 2’ या प्रश्नांची उत्तरे पडद्यावर देत नाही; ती प्रेक्षकाच्या विवेकावर सोपवतो. कारण ..... आरक्षणाने समाज विभागला नाही; विषमतेने समाज विभागला. आरक्षणाने मेरिट संपत नाही; संधींची दारे अधिक व्यापक होतात. जात आरक्षणामुळे निर्माण झाली नाही; जातीच्या विषम वास्तवामुळे आरक्षणाची गरज निर्माण झाली आणि शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट फक्त नोकरी मिळवणे नाही, माणूस घडवणे आहे!


पायलचे “जंगलात माणुसकी मिळते” हे वाक्य म्हणूनच केवळ संवाद राहत नाही; ते आपल्या तथाकथित प्रगत समाजाच्या विवेकाला दिलेली हाक बनते. जात विसरून माणूस पाहा, पूर्वग्रह सोडून वास्तव पाहा,

आणि संविधान हातात घेऊन समाज घडवा! 

शिक्षण, नोकरी आणि सत्तेच्या खुर्ची करता आरक्षणाचा लाभ घेऊन , आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या EWS,  ओबीसी बांधवांनी हा चित्रपट अवश्य बघावा. 

हीच ‘जयंती 2’ ची खरी जयंती आहे. 

=== अनिल भुसारी ===

तुमसर, जिल्हा भंडारा.

To Top