ब्राह्मण समाज सेवा संघाचे पुरस्कार जाहीर भाऊ तोरसेकर यांना जीवनगौरव तर हरी मुस्तीकर समाजभूषण चे मानकरी

shivrajya patra

सोलापूर : येथील ब्राह्मण समाज सेवा संघ आणि डॉ. त्र्यंबक लक्ष्मण चाटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव व समाजभूषण पुरस्कारांची  घोषणा करण्यात आली आहे. यंदा गणेश वसंत तथा भाऊ तोरसेकर यांना जीवनगौरव, तर हरी रामचंद्र मुस्तीकर यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अशी माहिती ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष दत्तराज कुलकर्णी आणि चाटी ट्रस्टच्या अध्यक्षा मीना चाटी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी पेठेनजिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अर्थात शिवस्मारक येथे होणार आहे. उद्योजक हरी एकनाथ गोडबोले (सोलापूर) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असं आहे. यावेळी भाऊ तोरसेकर यांचे ‘पत्रकारितेचा प्रवास’ या विषयावर व्याख्यान होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.


यापूर्वी डॉ. एम.जी. प्रधान, डॉ. अलबाळ, डॉ. जी. जी. जोग, डॉ. विजय कानिटकर, डॉ. मंजिरी चितळे, डॉ. माधवी रायते, डॉ. अरविंद देखणे, डॉ. संजीवनी केळकर, डॉ. एम.के. इनामदार आदींना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच डॉ. प्रा. राजाराम जोशी, पी.एम. हर्ष, ॲड. भास्करराव तथा तात्या नेर्लेकर, अरुण देशपांडे, मुकुंदरा कुलकर्णी, अरविंद जोशी आणि डॉ. जयंत करंदीकर यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला असल्याचे दत्तराज कुलकर्णी आणि मीना चाटी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


पुरस्कार सोहळ्यास नागरिक व समाजबांधवांनी उपस्थित राहावं, असं आवाहन संघाच्या अध्यक्षा मीना चाटी यांनी केलं आहे. 


पत्रकार परिषदेस सचिव राम तडवळकर, संचालक माधव देशपांडे, सुधीर कुलकर्णी, वामन कुलकर्णी, महेंद्र देवस्थळी, जितेंद्र कुलकर्णी आणि संतोष कुलकर्णी उपस्थित होते.

***

...पुरस्कार मानकऱ्यांविषयी थोडक्यात !

भाऊ तोरसेकर 

भाऊ तोरसेकर हे मुंबईतील लालबाग परिसरातील परळ येथे जन्मले असून, सुरुवातीला आर्किटेक्टकडे काम केल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. ‘आचार्य अत्रे’ यांच्या ‘मराठा’ सह विविध वृत्तपत्रांत त्यांनी आजवर काम केलं आहे. त्यांची ‘पोस्ट मॉर्टेम’ लेखमालिका व ‘जागता पहारा’ ब्लॉग लोकप्रिय आहे. सध्या ते समाज माध्यमावर ‘प्रतिपक्ष’ या नावाने यूट्यूब चॅनेल चालवितात.

हरी मुस्तीकर

हरी मुस्तीकर यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून त्यांनी पदविका प्राप्त केली. डेहराडून येथे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनमध्ये नोकरीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सोलापूर, पुणे व दिल्लीसह विविध ठिकाणी अभियंता म्हणून काम केले. 

त्यांनी किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतही काम केले. कंपनीतील विविध कामांची दखल घेत त्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते निवृत्त झाले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

To Top