सेवा संकल्प अभियानातून स्वच्छता व लोकसहभागाचा संकल्प उत्तर सोलापूरमध्ये स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांचा सन्मान

shivrajya patra

सोलापूर  : उत्तर सोलापूर तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून, अभियानाच्या तालुकास्तरीय कक्षाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले.


या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता, लोकसहभाग, सुशासन आणि विविध विकासात्मक उपक्रमांना चालना देण्यावर भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने ‘एक दिवस स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत स्वयंस्फूर्तीने गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तरुणांचा जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.


मार्डी, बीबीदारफळ, कौठाळी आणि अकोलेकाटी या गावांतील सरपंच तसेच स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होणाऱ्या तरुणांचा यावेळी गौरव करण्यात आला. तरुणांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी इतर गावांसाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘सेवा संकल्प अभियानाचा’ उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


यानंतर उत्तर सोलापूर पंचायत समिती परिसरातून बाईक रॅलीला उत्साहात सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅली डफरीन चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रंगभवन येथे पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या गावांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा. आपापले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा तसेच लोकसहभागातून स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवावेत, असं आवाहन केले.



कार्यक्रमास कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, उपसभापती सुनील भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्यासह पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.


स्वच्छ गाव, सक्षम ग्रामपंचायत आणि सक्रिय लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला’ गती देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 


स्वच्छतेसाठी तरुणाईने घेतलेला पुढाकार, वृक्षारोपणातून दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि लोकसहभागातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे ‘सेवा संकल्प अभियानाची’ उत्तर सोलापूर तालुक्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली.

******

To Top