सोलापूर : येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ उत्सव समितीतर्फे गणेशोत्सवानिमित्त नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबिर रविवारी, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 09 ते दुपारी 02 वा. दरम्यान श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ येथे होणार आहे.
या शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हिमोग्लोबिन आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच महिलांसाठी गर्भाशयाशी संबंधित समस्या, अपत्य प्राप्तीच्या अडचणी, बाळंतपणापूर्वीची तपासणी, मासिक पाळीच्या समस्या, सतत अंगावरून पांढरे जाणे यासह विविध स्त्रीरोगांबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डॉ. दीपिका चिंचोळी (एमबीबीएस, स्त्रीरोग तज्ज्ञ) आणि डॉ. वीणा माने-कात्रे (एमबीबीएस, स्त्रीरोग तज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय.
यावेळी यशोधरा हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर तसेच धर्मदाय रुग्णालय योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शासनाच्या नियमांनुसार धर्मदाय रुग्णालयांमध्ये गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जातात. या योजनेची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
तसेच श्री सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदानासाठी नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे.
या शिबिराचा विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असं आवाहनही मंडळाच्या वतीने कळविण्यात आलं आहे.
***
सामाजिक उपक्रमात व्हावं सहभागी !
“गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उपक्रमांसोबतच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. नागरिक व भाविकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे.”
जगदीश हिरेहब्बू, उत्सव अध्यक्ष,
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ, सोलापूर.
-----

