मराठा सेवा संघ परिवर्तनाच्या दिशेने एक वैचारिक संवाद

shivrajya patra

        

         मराठा सेवा संघ 

परिवर्तनाच्या दिशेने एक वैचारिक संवाद

राठा सेवा संघ ही केवळ एका समाजाची संघटना म्हणून पाहण्यापेक्षा बहुजन समाजाच्या वैचारिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाची चळवळ म्हणून तिच्याकडे पाहणे अधिक आवश्यक आहे. 

संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी चळवळ,  राष्ट्रमाता जिजाऊ,  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समतावादी विचारांची परंपरा पुढे नेण्याबरोबरच मराठा सेवा संघाने धर्म, जात, कर्मकांड आणि सामाजिक विषमता यांचा चिकित्सक विचार करण्याची शिकवणूक दिलेली आहे.

कुणबी-मराठा व ओबीसी समाज : कुणबी-मराठा व ओबीसी समाज हा इतिहास, शेती, श्रम, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तनाशी जोडलेला मोठा समाज घटक आहे, मात्र केवळ संख्याबळ पुरेसे नसते. शिक्षण, ज्ञाननिर्मिती, आर्थिक स्वावलंबन, संघटन आणि वैचारिक नेतृत्व या क्षेत्रांत सक्षम होणे आवश्यक आहे. 

धर्माच्या नावावर होणाऱ्या अनावश्यक कर्मकांडावर खर्च करण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी, वाचनालयांसाठी, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी, स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी संसाधने वापरली तर त्याचा समाजाच्या भवितव्यावर अधिक सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हा विचार मराठा सेवा संघ बहुजन समाजाला गेल्या 36 वर्षापासून सांगत आहे.  मराठा सेवा संघाचा विचार बऱ्यापैकी समाजाने स्वीकारलेला आहे.

मराठा सेवा संघाची वैचारिक भूमिका : मराठा सेवा संघाने सामाजिक परिवर्तनच्या जबाबदारीचे भान ठेऊन केवळ समाजाच्या अस्मितेचे राजकारण न करता बहुजन ऐक्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता, संविधानिक मूल्ये, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा कार्यक्रम बहुजन समाजासमोर ठेऊन 36 वर्षापासून या अनुषंगाने काम करत आहे. यात खूप मोठ्या प्रमाणात नाही, परंतु थोडाफार प्रमाणामध्ये यश मिळालेले आहे. 

मराठा सेवा संघाच्या विचारामुळे ज्या तरुणांच्या हातामध्ये दगड होते, त्या तरुणांच्या हातामध्ये पुस्तक आले. आता मराठा, कुणबी, माळी, धनगर, ओबीसी, दलित, आदिवासी आणि इतर वंचित घटकांमध्ये काम करणाऱ्या विविध संघटनांनी परस्पर संघर्ष निर्माण करण्याऐवजी समाजाच्या समान प्रश्नांवर एकत्र येण्याची गरज आहे. कारण बहुजनांची खरी ताकद ही त्यांच्या संख्येत नसून त्यांच्या वैचारिक एकजुटीत आहे.

मराठा सेवा संघाची वाटचाल शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांशी जोडली गेलेली आहे. ती केवळ मराठा समाजापुरती मर्यादित नसून व्यापक बहुजन प्रबोधनाची प्रभावी चळवळ बनलेली आहे. गरज आहे, मराठा सेवा संघाचा विचार सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याची ! 

मराठा सेवा संघ नेहमीचं सांगत आलेला आहे की, आज आपल्याला धर्माच्या नावाने विभाजनाची गरज नाही, तर मानवतेच्या नावाने एकजुटीची गरज आहे. कर्मकांडाच्या अंधानुकरणाची नव्हे, तर विवेकाची, जन्माधारित श्रेष्ठत्वाची नव्हे, तर गुणवत्ताधारित समान संधीची गरज आहे.  

बहुजन समाजाने देव-धर्माच्या वादात अडकून राहण्यापेक्षा शिक्षण, सत्ता, संपत्ती आणि ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात आपले स्थान मजबूत  करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहावे, ही मराठा सेवा संघाची शिकवण आहे. ही शिकवण घेऊन बहुजन समाजात परिवर्तनाच्या दिशेने एक वैचारिक संवाद निर्माण करूया. 

मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या समस्त बहुजन समाजाला मनःपूर्वक शिव सदिच्छा..!!

=== अनिल भुसारी ===

   तुमसर, जिल्हा भंडारा.



To Top