ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन

shivrajya patra

              कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी 

अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू असलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या, मात्र कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. अहिल्यानगरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


शकुंतला यांचा जन्म 1960 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई छबूबाई नगरकर याही त्या काळातील नामांकित लावणी कलावंत होत्या. घरातूनच लावणीचा वारसा लाभलेल्या शकुंतला यांनी बालपणीच कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांचं प्रारंभीचं आयुष्य नगरमध्ये गेले. त्यांनी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी पहिल्यांदा घुंगरू बांधले आणि लावणी क्षेत्रात पदार्पण केले. 


पुणे, सोलापूर आणि बेळगाव या भागांमध्ये त्यांचा अधिक काळ गेला. शकुंतला नगरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य लावणी कलेच्या संवर्धनासाठी आणि सन्मानासाठी वेचलं. 


पारंपारिक संगीत बारीमधील बैठकीची लावणी, शृंगारिक अदा, डोळ्यांतील भावमुद्रा आणि नजाकत यावर शकुंतला यांचं विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या प्रत्येक अदाकारीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा ठसा उमटलेला असायचा.


1974 मध्ये मुंबई या गिरणगावातील प्रसिद्ध लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये त्यांच्या लावणीचा प्रवास खऱ्या अर्थाने बहरला. अनेक दशके त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि अदाकारीने रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. शकुंतला यांनी केवळ पारंपरिक शैलीवर अवलंबून न राहता कथ्थक गुरू वसंतराव घाटगे यांच्याकडून नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. यामुळे त्यांच्या बैठकीच्या लावणीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. 


त्यांनी पारंपरिक मंचासोबतच 'लावणी के रंग' आणि 'लव्ह अँड लावणी' सारख्या आधुनिक प्रयोगांद्वारे नव्या पिढीपर्यंत लावणी पोहोचवली. त्यांच्या या मोलाच्या योगदानाची दखल घेत शासनाने व विविध संस्थांनी त्यांना प्रतिष्ठित शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, 2018 मध्ये मुंबई महापौर पुरस्कार आणि 2023 मध्ये नाट्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.


To Top