सोलापूर : सन 2026-27 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना - ‘प्रति थेंब अधिक पिक’ (सूक्ष्म सिंचन) योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.
आवश्यक कागदपत्रे - ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जातीचा दाखला.
या योजनेचा लाभ 05 हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येणार आहे. पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जांवर ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. अर्जांची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे माहिती देण्यात येईल.
पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून सूक्ष्म सिंचन संचाची खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत मोका तपासणी होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा सामाईक सेवा केंद्राशी (सीएससी) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
***
