शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या शिक्षक-मुख्याध्यापकांच्या गौरव
सोलापूर : शिक्षकांना समाजामध्ये आदराचे स्थान असून त्यांच्या योगदानामुळेच विद्यार्थ्यांची पर्यायानं समाजाची प्रगती होते. शिक्षक केवळ ज्ञानदानाचे काम करीत नसून विद्यार्थ्यांचे जिवन घडविण्याचे काम करीत असतात, असं प्रतिपादन माजी आमदार तथा सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या गौरव समारंभात सभापती दिलीप माने प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. माजी महापौर ॲड यु. एन. बेरिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अ. भा. उर्दू साहित्य संमेलन समितीतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 08 शिक्षक, 04 मुख्याध्यापक, 01 प्राध्यापक आणि 01 क्रिडा शिक्षक अशा 14 गुरुजनांचा उत्कृष्ठ मुख्याध्यापक व शिक्षक म्हणून स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शॉल, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुप्रसिध्द कवि आणि लेखक बशीर परवाज यांच्या निधनानिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात एम. ए. पानगल ॲग्लो उर्दू हायस्कूल व नॅशनल उर्दू प्राथमिक या शाळांना सर्वोत्कृष्ठ माध्यमिक व प्राथमिक शाळा म्हणून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आले.
उर्दू ही गोड भाषा असून सर्व समाजाची आहे, ती टिकली व वाढली पाहिजे. एकमेकांनी विविध भाषा आत्मसात केल्यास जिव्हाळा निर्माण होतो, असं प्रमुख पाहुणे सभापती दिलीप माने यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत संस्थेचे सेक्रेटरी रियाज वळसंगकर यांनी केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी मुख्याध्यापिका सादेका आईने हयात बारागझी आणि पानगल हायस्कूलचे मुख्याध्यापक हारुण बागवान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक रफिक खान, याकुब मंगलगिरी, जावीद उस्ताद, इक्बाल शेख, हारुण बंदुकवाला, रफीक नल्लामंदू, अय्युब नल्लामंदु आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केले तर म. हुसेन बक्षी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
*
... चौकट
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच चांगले संस्कार देण्याची आवश्यकता : ॲड यु. एन. बेरिया
शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन ज्ञानदानाचे काम करावं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच चांगले संस्कार देण्याची आवश्यकता आहे, असं ॲड यु. एन. बेरिया यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्व स्पष्ट केले. त्यांनी शिक्षक सेवा अत्यंत अनमोल आहे, असंही शेवटी म्हटले.
**

