"यु-ट्युब" मधील शक्कल लढवून केला गुन्हा ! खूनासह घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस 05 दिवसांची पोलीस कोठडी

shivrajya patra

 

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी 

सोलापूर : घरफोडीच्या उद्देशानं बळजबरीने घरात घुसून 61 वर्षीय इसमाची हत्या करुन कपाटातील 2, 40, 000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने वगैरे चोरून नेल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अजयकुमार गौतम चव्हाण याला जेरबंद केलंय. "यु-ट्युब" मधील शक्कल लढवून आरोपी अजयकुमारनं हा गुन्हा केल्याचं तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.

माढा तालुक्यातील जामगांव इथं, 25 ऑगस्टची रात्र ते दुसऱ्या दिवशी सकाळदरम्यान घरफोडीच्या उद्देशानं घरात घुसून अशोक भीमान्ना मुळे (वय-61 वर्षे), यांना घातक हत्याराने डोक्यात जबर मारहाण करुन त्यांना जिवे ठार मारुन घरामध्ये असलेले लोखंडी कपाट उचकटून कपाटामध्ये ठेवलेले 2, 40, 000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने वगैरे चोरून नेले. याप्रकरणी मृताचा मुलगा विजयकुमार मुळे यांनी फिर्याद दिल्याने माढा पोलीस ठाण्यात बीएनएस क. 103 (1), 331 (7) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.


हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्याने घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (बार्शी उपविभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि दुय्यम अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची सविस्तर माहिती घेतली. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकामी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना दिल्या होत्या. 



स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदारांची 04 स्वतंत्र तपास पथके

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची 04 स्वतंत्र पथके तयार केली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि/विजय शिंदे आणि त्यांचे पथक गुन्ह्याच्या तपासात जामगाव इथं गुन्हा घडल्यानंतर 3 दिवस गावामध्ये तळ ठोकून घटनास्थळाची बारकाईने निरीक्षण करत असताना घटनास्थळाच्या काही अंतरावर मिळून आलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यावरुन आरोपी संबंधी सुगावा लागला. 


त्या अनुषंगाने अधिक माहिती काढत असताना सपोनि विजय शिंदे आणि त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, हा गुन्हा त्याच गावातील अजयकुमार चव्हाण याने केला असल्याचा संशय असून त्यानं घटनास्थळाकडे येताना तसेच निघून जाताना मोटार सायकलचा वापर केला असल्याचे दिसून आले. 


त्यावरुन अजयकुमार चव्हाण याची माहिती घेतली असता, तो मागील दोन वर्षापासून जामगावात राहवयास नसून तो लऊळ येथे वास्तव्यास असून अधुन-मधुन जामगाव येथे येत असल्याचे समजले. पोलीस पथक त्याच्या मागावर असल्याचा संशय आल्याने अजयकुमारने त्याचा मोबाईल बंद करुन फरार झाला होता. त्यावरुन त्यानेच गुन्हा केल्याचे संशय आल्याने त्याचा शोध घेत असताना, सीसीटीव्ही फुटेज वरुन तो कलबुर्गी (कर्नाटक) भागात असल्याचे समजले. 


त्यानंतर पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांनी आरोपीचा शोध घेऊन जेरबंद करण्यासाठी सपोनि विजय शिंदे आणि अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून त्यांना कलबुर्गी भागात रवाना केले. सपोनि शिंदे, सपोफौ नारायण गोलेकर व पथक कलबुर्गी कर्नाटक भागात रवाना केले होते. 



वाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्मवर आरोपी लागला पोलिसांच्या हाती 

कलबुर्गी येथे आरोपीचा शोध घेत असताना सदर पथकास माहितीनुसार तो वाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म वर वावरत आहे. तेव्हा सपोनि विजय शिंदे आणि पथक यांनी वाडी येथे जाऊन वाडी रेल्वे पोलीसांची मदत घेऊन आरोपीचा शोध घेत असताना तो वाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्मवर मिळाला. त्यास पथकाने नाव गाव पत्ता विचारता, त्यानं त्याचं नाव अजयकुमार गौतम चव्हाण (वय 31 वर्षे, रा.जामगांव) असं असल्याचे सांगितले. 

"यु ट्युब" मध्ये पाहिलेल्या व्हीडीओमधील पध्दतीचा वापर करुन उघडले कुलूप

आरोपी अजयकुमारला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता, तो कर्जबाजारी झाल्याने पैशाची गरज असल्यानं चोरी करण्याच्या उ‌द्देशाने मुळे यांच्या घराच्या पाठीमागील पाईपवरुन वर चढून घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने वरच्या खोलीस लावलेले लोखंडी कुलुप "यु ट्युब" मध्ये पाहिलेल्या व्हीडीओमधील पध्दतीचा वापर करुन सिरेंजच्या साह्याने कुलुपामध्ये पेट्रोल टाकून पेटवून कुलुप उघडून घरामध्ये प्रवेश केल्यावर कपाट उचकट असताना घरामध्ये झोपलेले अशोक मुळे हे जागे झाले. 


त्यांनी आरोपीस ओळखल्यामुळे आरोपीनं त्याच्या जवळील हातोड्यानं अशोक मुळे यांच्या डोक्यात जबर मारहाण करुन जिवे ठार मारले. त्यानंतर घरामध्ये चोरी करुन निघून गेला असल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता माढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. 


त्यास अटक करुन आरोपी अजयकुमारला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. माढा पोलीस ठाणे प्रभारी अधीकारी सपोनि रोहित शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

.... यांनी पार पाडली कामगिरी 

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे (पंढरपूर विभाग), उपविभागीय पोलीस अधीकारी सुहास जगताप (बार्शी उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, बालाजी कांबळे, संजय राठोड आणिपथकातील अंमलदार सपोफौ नारायण गोलेकर, पोहेकॉ सलीम बागवान, रवि माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, आबासाहेब मुंढे, मपोहेका अश्विनी गोटे, पोकॉ अनवर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, योगेश जाधव, सुरज रामगुडे, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, रतन जाधव, चापोकॉ सुनिल पवार, तसेच माढा पोलीस ठाण्याकडील सपोनि रोहित शिंदे, पोउपनि मोहमद शेख व अंमलदार पोकॉ विवेक माने, सचिन देशमाने आणि सायबरकडील पोकॉ पवार यांनी पार पाडल्याचं अपर पोलीस अधीक्षक कबाडे यांनी सांगितले. 

*

To Top