कासेगांव येथे 700 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी महादेव मंदिर

shivrajya patra

तेराव्या शतकातील वास्तुकलेचा सुंदर नमुना

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे जवळपास तेराशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शंभू महादेव मंदिर पुरातन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. त्यामुळे श्रावणमासात या मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांत ओढ व आकर्षण दिसून येते.


मंदिरातील गाभाऱ्यात दीड ते दोन फूट उंचीवर सिंहासनावर शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंहासनावर शिवलिंग दुर्मिळ असल्याचे येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात. मंदिराची रचना अशा पद्धतीची आहे की, सकाळच्या वेळी सूर्याची किरणे शिव पिंडीवर पडतात, असंही येथील भाविक सांगतात.


मंदिर अतिशय सुबक व रेखीव आहे. मंदिरातील दगडावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. खांब कोरीव व आकर्षक आहेत. ते पाहणाऱ्यांना अत्यंत विलोभनीय वाटते. शिखरावर हनुमान व इतर देव-देवतांच्या मूर्ती आहेत. वरच्या बाजूला बारा ज्योतिर्लिंग आहेत. लिंगासमोर पितळी धातूचा नंदी आहे. मंदिराशेजारी त्याच पद्धतीचा गणपती व बळी देवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत.



मंदिराशेजारी चाफा हे फुलाचे झाड आहे. शंकराला चाफा हे फूल प्रिय आहे, असं मानले जाते. मंदिरात पहाटे व संध्याकाळी पूजा व आरती केली जाते. चैत्र महिन्यात यात्रा भरते. सात दिवस यात्रा चालते. 



शंभू महादेवाच्या यात्रेपूर्वी कासेगांव आणि गंगेवाडी येथील ग्रामस्थ कावड शिखर शिंगणापूरला नेतात. अवघड अशा मुंगी घाटातूनही ही कावड सहज वर नेली जाते. तेथून कावड परत आणून मंदिरात पूजा करून गावातून मिरवणूक काढतात. 



श्रावण महिन्यातील दर सोमवारी पूजा बांधली जाते. या पूजेसाठी विविध फळांचा वापर केला जातो. श्रावण महिन्यातील पवित्र वातावरणात दर्शनासाठी पंचक्रोशीतील भक्तांची झुंबड उडते. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार केला आहे. शिखरावर केलेल्या रंगरंगोटीमुळे मंदिर अधिकच आकर्षक दिसत आहे.

            .                                          (गणेश मंदिर)

सध्या माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रयत्नातून तीन कोटी रुपयांचा निधी या मंदिराला मिळाला आहे. पुरातत्त्व विभागाकडून या मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे. जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास आलं आहे. लवकरच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.


फोटो ओळी : दक्षिण सोलापुरातील कासेगांव येथील 13 व्या शतकातील हेमाडपंथी मंदिर भाविकांना श्रावण महिन्यात आकर्षित करीत आहे.

******

शब्दांकन : राजशेखर बुरकुले, सोलापूर.




To Top